मोहोळचे व्यापारी झाले नगरपरिषदेवर नाराज...!!!
मोहोळ (जि. सोलापूर) ः कोरोना प्रतिबंधासाठी मोहोळ नगरपरिषदेने आता कंबर कसली असून मास्क न वापरणे, हॅन्ड ग्लोज न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी दोन दिवसात 73 नागरिकांसह व्यापाऱ्यांवर कारवाई करून, आठ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी के एन पाटील यांनी दिली. दरम्यान, कारवाई करताना व्यापाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून नगरपरिषदेच्या या कारभारावर व्यापारी वर्ग नाराज झाला आहे.
या संदर्भात सहाय्यक कार्यालय निरिक्षक श्रीमती एस टी हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंधासाठी सध्या सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. शासनाने घालून दिलेल्या अटीचे पालन केले तर कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध होणार आहे. नगरपरिषदेने कारवाईसाठी पथक नेमले असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भाजी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी हॅन्ड ग्लोज न वापरणे, मास्क न वापरणे असे प्रकार निदर्शनाला येत आहेत. त्यासाठी शंभर ते दोनशे रुपये दंड वसुल केला जात आहे.
मोहोळमध्ये सकाळी नऊ वाजता दुकाने उघडली जातात, तर नगरपरिषदेचे पथक त्याच वेळी कारवाईसाठी तैनात असते. एखाद्या व्यापाऱ्याची विक्री झाली नाही व त्याने जर दंडाच्या रकमेसाठी एक तासाची जरी मुदत मागितली तरी त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते. पैसे दे नाहीतर आमच्या गाडीत बस, अशी त्याची धमकी केली जाते. तसेच सुरक्षेसाठी सोबत असलेले कर्मचारीही व्यापाऱ्याला वेडेवाकडे बोलून त्याचा अपमान करतात. यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था मोहोळच्या व्यापाऱ्यांची झाली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे मोहोळची बाजारपेठ ओस पडली आहे, अनेक लहान उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आता कुठे थोडेफार मार्केट सुरू होऊ लागले तर हा त्रास. यामुळे नगरपरिषदेबाबत व्यापाऱ्यात मोठी नाराजी पसरली आहे.
असा प्रकार पुन्हा होणार नाही
व्यापाऱ्याच्या बाबतीत झालेला प्रकार माझ्या कानावर आला आहे. त्या बाबत माणसासी माणसा सारखे वागा अशा सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, असा प्रकार पुन्हा होणार नाही.
- के एन पाटील, मुख्याधिकारी ,मोहोळ
व्यापाऱ्यांना मुदत द्यावी
नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्या बाबतीत सहकार्याचे धोरण ठेवावे. दंडाची रक्कम भरण्यास व्यापाऱ्याने मुदत मागीतली तरी द्यावी. कायद्यावर बोट ठेऊ नये. अगोदरच व्यापारी अडचणीत आहेत.
- नाना डोके, अध्यक्ष ,चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.