सिद्धेश्वर मंदिर प्रवेशासाठी "वंचित'चे सोमवारी आंदोलन 

प्रमोद बोडके
Thursday, 3 September 2020

श्रावणात मंदिर प्रथमच ओस 
ग्रामदैवत सिध्दरामेश्‍वरांच्या दर्शनासाठी दर सोमवारी, श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. यावर्षीच्या श्रावणात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण श्रावण महिना भाविकांशिवाय मंदिर ओस पडले होते. 

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या धर्तीवर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले व्हावे अशी प्रमुख मागणी आता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी सोमवारी (ता. 7) सकाळी 9 वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपुरात आंदोलन झाल्यानंतर सरकारने दखल घेतली. सोलापुरातही तशाच पध्दतीने व्यापक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष गणेश पुजारी यांनी दिली. गेल्या पाच महिन्यांपासून सिद्धेश्वर मंदिर कुलूपबंद आहे. दर्शनापासून भाविक वंचित आहेत. कोरोनामुळे नगरवासीय भयभीत आहेत.

ही भीती भय अन कोरोनाची चिंता दूर व्हावी अशी वंचित बहुजन आघाडीची अपेक्षा आहे. मंदिरात गेल्याने अथवा तिथे डोळे मिटून ध्यान केल्याने मनातील भीती, भय दूर होण्यास मदत होते असा विश्‍वास नगरसेवक पुजारी यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक असलेले नियम, अटी घालून देऊन मंदिर खुले करण्यास काहीच हरकत नाही. सोमवारच्या आंदोलनात विविध जाती धर्माच्या घटकांमधील भक्तगणांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष 
नगरसेवक गणेश पुजारी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monday agitation of 'Vanchit' for admission to Siddheshwar temple