जानेवारी महिन्यातच सूर्याने सुरू केलंय तळपायला ! सोलापूर तापमान @ 35 अंश सेल्सिअस 

sun_stroke
sun_stroke

सोलापूर : शहरातील सध्याचे वातावरण पाहिले तर उन्हाळा सुरू झाला असं वाटत आहे. सोलापूर म्हटलं की कडक उन्हाळा हे समीकरण फार जुने आहे. सोलापुरात साधारणतः थंडी ही ऑक्‍टोबर महिना अखेरीस चालू होऊन साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बऱ्यापैकी असते आणि होळी हा सण झाला किती तिथून उन्हाळा सुरू होतो. सध्या जानेवारी हा महिना चालू आहे आणि दरवर्षी या महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते. परंतु वर्षाच्या सुरवातीपासूनच सोलापूर शहरातील तापमानात झालेली वाढ पाहता असे निदर्शनास येत आहे, की उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. वातावरण हे कधी ढगाळ तर कधी कडक ऊन असेच पाहावयास मिळत आहे. सोलापुरातील कमाल तापमानाचा पारा हा गेला आठवडाभरात 35 अंश सेल्सिअस इतका आहे. 

वास्तविक पाहता, दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान हे 30 ते 35 अंश सेल्सिअस इतके असते. परंतु यावर्षी जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच तापमानातील पारा वाढल्याने अंगाची लाही- लाही होत आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यात तर तापमान हे साधारणतः 45 अंशापर्यंत जाते. परंतु जानेवारी महिन्यातच ऊन वाढल्याने सोलापूरकरांना यंदाच्या वर्षी अधिक प्रमाणातील कडक उन्हाला सामोरे जावे लागेल असे वाटत आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस गायब झालेली थंडी जानेवारी महिन्याच्या सुरवातीस देखील गायबच आहे. 

सोलापूरचे भौगोलिक स्थान आणि सोलापूरचे हवामान यावर सबंध जिल्ह्याची शेती अवलंबून आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. परंतु दररोज कामाला जाणाऱ्या सामान्य सोलापूरकरांनी आता कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे, ही मानसिकता तयार केली आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणाचा सर्वात मोठा फटका हा सिझनल येणाऱ्या पिकांना बसला आहे. त्यातच भर म्हणून गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील बार्शीसारख्या तालुक्‍यांमध्ये पाऊस झाला आणि शेतकऱ्यांसह सामान्यांची तारांबळ उडाली. 

यावर्षी तर संपूर्ण शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत. ड्रेनेज पाइपलाइन टाकणे, नवे रस्ते तयार करणे यांसारख्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच हा वाढता उन्हाळा शहरवासीयांना त्रासदायक ठरत आहे. 

सध्या शहरात कोरोना महामारीची तीव्रताही कमी होत असतानाच चिंतेत अजून वाढ म्हणून अशा कडक उन्हाला सोलापूरकरांना सामोरे जावे लागत आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण जगाला ग्लोबल वॉर्मिंग या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड या गोष्टी प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यामुळे आपण सोलापूरकर म्हणून स्वतःचे असे एक तरी झाड लावून जतन केले पाहिजे, हा संकल्प जर रुजवला तरच येणाऱ्या काळामध्ये तापमान नियंत्रित राहू शकते 

शहरातील तापमान (कमाल - किमान) 

  • 9 जानेवारी (34 - 21) 
  • 10 जानेवारी (33 - 20) 
  • 11 जानेवारी (35 - 19) 
  • 12 जानेवारी (34.8 - 18.8) 
  • 13 जानेवारी (35.1 - 18.6) 
  • 14 जानेवारी (30.8 - 15.9) 
  • 15 जानेवारी (31.4 - 15.5) 

तापमान वाढल्याने उन्हाळा जवळ आला की काय असे वाटत आहे. मला तर दररोज दुचाकीवरून ये- जा करणे अवघड होत आहे. त्यामुळे मी कामाला नियोजित वेळेपेक्षा सकाळी लवकर जाण्यास सुरवात केली आहे. 
- रमेश गायकवाड, 
नागरिक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com