
सांगोला तालुक्यातील 162 शाळांमध्ये 10 हजार 820 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर 1 हजार 76 शिक्षकही पहिल्या दिवशी उपस्थित राहिले. तालुक्यात चार शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून पहिल्या दिवशी 12 हजार 423 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर 52 शिक्षकही गैरहजर राहिले.
सांगोला : राज्य शासनाच्या आदेशाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (ता. 27) पासून सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरवण्यात आले. सांगोला तालुक्यातील 162 शाळांमध्ये 10 हजार 820 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर 1 हजार 76 शिक्षकही पहिल्या दिवशी उपस्थित राहिले. तालुक्यात चार शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून पहिल्या दिवशी 12 हजार 423 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर 52 शिक्षकही गैरहजर राहिले.
राज्य शासनाने 23 नोव्हेंबर 2020 पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्याच वेळी तालुक्यात 32 शिक्षक कोरोनाग्रस्त आढळले. त्यानंतर राज्य शासनाने मागील आठ दिवसांपूर्वी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान, 25 जानेवारी रोजी तालुक्यातील गावा-गावांमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. याच वेळी तालुक्यातील 978 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये 935 शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये चार शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
पाचवी ते आठवीसाठी तालुक्यात 1 हजार 128 शिक्षक असून 1 हजार 76 शिक्षक पहिल्या दिवशी उपस्थित होते. तालुक्यात 27 केंद्रे असून सांगोला, एखतपूर, मांजरी, वाढेगाव, शिरभावी, जवळा, कडलास, पारे, घेरडी, मेडशिंगी, वाकी (घेरडी), महूद, चिकमहूद, कटफळ, महिम, शिवणे, खवासपूर, नाझरे, चोपडी, उदनवाडी, वाटंबरे, कमलापूर, अकोला, कोळा, सोनंद, किडबिसरी, व हातिद अशा 27 केंद्रामध्ये 162 शाळा आहेत. पाचवी ते आठवीच्या वर्गामध्ये 23 हजार 243 विद्यार्थी असून काल 10 हजार 820 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व तज्ञ शिक्षकांनी तालुक्यातील या शाळांना भेटी दिल्या. काल सांगोला केंद्रामध्ये सर्वाधिक म्हणजे 1 हजार 769 विद्यार्थी उपस्थित होते.
तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये मास्क, सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, टेम्परेचर, पल्समीटर आदींचा वापर करत असलेल्या 150 शाळा आढळल्या. तालुक्यात 4 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळच माजलेली आहे. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याहूनही कमी असल्याचे पाहावयास मिळाली आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गाचा यशस्वी टप्पा झाल्यानंतरच पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल