संपर्कात नसलेले खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी आता येताहेत मतदारांच्या संपर्कात ! 

MP Mahaswami
MP Mahaswami

मंगळवेढा (सोलापूर) : मतदारसंघात संपर्क ठेवण्यास कमी पडल्याची ओरड खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बाबतीत विरोधकांकडून होत असताना, याच महिन्यात तीन वेळा दौरा करून मतदारांशी संपर्क साधून तो आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी केला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सातत्याने देश पातळीवर तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून ते आजतागायत या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व लाभले. विकासाच्या मुद्‌द्‌यावरून टीका होत राहिल्या. त्यांच्याच मतदारसंघात 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत उद्‌भवलेल्या 35 गावांच्या पाणी प्रश्नावरून 22 गावांच्या बहिष्काराचा विषय देशपातळीवर गाजला. त्यानंतर तत्कालीन खासदार शरद बनसोडे यांनी हा प्रश्न लोकसभेत मांडला पण पाठपुरावा करण्यास कमी पडले. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंढरपूर मतदारसंघात कमी संपर्क ठेवल्याची ओरड होत असतानाच, त्यांचा पत्ता लोकसभा निवडणुकीत कट करण्यात आला. 

त्यानंतर भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना संधी दिली. वास्तविक पाहता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून लोकांमध्ये एक वेगळाच सुरू उलटला होता, त्यातच त्यांच्या विरोधातील प्रचारात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार महास्वामींवर टीकास्त्र सोडताना, "महाराजांचे मठात काम असते इथे (निवडणुकीत) काय काम?' असा आरोप केला. तरी महास्वामी निवडून आले. त्यांच्या विजयानंतर काही दिवस जात प्रमाणपत्रावरून ते चर्चेत राहिले, तर गतवर्षी पंढरपूर व मंगळवेढामध्ये पूर परिस्थिती उद्‌भवली. तशीच परिस्थिती यंदाही उद्भवली. त्याअगोदर नागपूर - रत्नागिरी महामार्गाच्या कामावरील माचणूर चौकात बोगदा करण्याच्या संदर्भातील मागणी ग्रामस्थांनी थेट खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे केली. त्या वेळेस प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचा विषय मार्गी लावण्याचे सूतोवाच खासदार महास्वामी यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाचा दौरा देखील केला. 

दोन दिवसांपूर्वी खासदार महास्वामी यांनी मंगळवेढ्यातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये जनता दरबार आयोजित करून शहर व तालुक्‍यातील 140 नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन स्वीकारून त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यापुढील काळात दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हा त्यांचा जनता दरबार भरणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे संपर्कात नाही म्हणणारे खासदार आता पुन्हा लोकांच्या संपर्कात आल्यामुळे यांच्या माध्यमातून जे प्रश्न देश पातळीवरचे आहेत ते सुटण्यास मदत होईल. परंतु त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजनेसाठी मिळणारे कमी उद्दिष्ट, त्यामुळे वंचित बेघरांना कायमस्वरूपी निवारा कधी मिळणार? त्यासाठी उद्दिष्ट वाढवण्याची गरज आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील त्रुटींचा विषय असो अथवा रखडलेला पंढरपूर - विजयपूर रेल्वेचा प्रश्न, त्यासाठी खासदार महास्वामी किती ताकदीने प्रयत्न करतात, यावर या रखडलेल्या प्रश्नांचे भवितव्य अवलंबून आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com