esakal | केंद्रीय गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Naik-Nimbalkar

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची नुकतीच भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सीबीआय, ईडी, कॅगचा समावेश असलेल्या महत्त्वाच्या कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची निवड

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची नुकतीच भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सीबीआय, ईडी, कॅगचा समावेश असलेल्या महत्त्वाच्या कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

खासदार नाईक - निंबाळकर हे भारत सरकारच्या टेलिफोन सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. तसेच रेल्वेच्या विभागीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहात आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत सांगोला तालुक्‍याच्या टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनच्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामास मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या शेतीमाल व फळांना देशाची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी व जादा दर मिळण्यासाठी सांगोला ते मुझफ्फरपूर ही देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली व माढा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय दिला. 

ते भारत सरकारच्या जलसंपदा समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सांगोला तालुका व नीरा उजवा कालव्याला यापूर्वी केंद्र सरकारने मंजूर केलेला 937 कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अशा कॅबिनेट दर्जाच्या विविध समित्यांवर निवड झालेले खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर हे देशातील एकमेव खासदार आहेत. 

केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार नाईक - निंबाळकर यांची भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सीबीआय, ईडी, कॅगचा समावेश असलेल्या महत्त्वपूर्ण कमिटीवर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी खासदार नाईक-निंबाळकर व सातारा जिल्हा परिषद सदस्या, लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर प्रा. लि. साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका जिजामाला नाईक- निंबाळकर यांचा सपत्नीक सत्कार केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल