पाटील परिवारावर कायम प्रेमच राहणार : खासदार शरद पवार 

सुनील कोरके 
Tuesday, 29 September 2020

यशवंतभाऊ व राजूबापू पाटील यांची गेल्या दोन पिढ्यांपासूनची निष्ठा कायम आमच्या लक्षात राहील. त्यासाठी कुठलीही अडचण असल्यास हक्काने सांगा, ती तत्काळ सोडवू, असे अभिवचन माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी सांत्वनपर भेटीत राजूबापू पाटील यांचे सुपुत्र गणेश पाटील यांना दिले. 

भोसे (क) (सोलापूर) : यशवंतभाऊ व राजूबापू पाटील यांची गेल्या दोन पिढ्यांपासूनची निष्ठा कायम आमच्या लक्षात राहील. त्यासाठी कुठलीही अडचण असल्यास हक्काने सांगा, ती तत्काळ सोडवू, असे अभिवचन माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी सांत्वनपर भेटीत राजूबापू पाटील यांचे सुपुत्र गणेश पाटील यांना दिले. 

भोसे (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, त्यांचे बंधू महेश पाटील व चुलते अनंतराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन श्री. पवार यांनी त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्याबरोबर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, आमदार यशवंत माने उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, सीईओ प्रकाश वायचळ, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी श्री. पवार यांनी राजूबापू पाटील यांच्या आठवणी सांगताना, वीज व पाण्याचा प्रश्न त्यांनी अनेकवेळा माझ्याशी मांडला. अतिशय जिद्द व चिकाटी त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या विचाराने भविष्यातही काम करा, सगळ्यांशी मिळून राहा, कोणतीही अडचण आल्यास फोन करा किंवा समक्ष भेटा, असे आवर्जून सांगितले. 

या वेळी घरांतील सर्व व्यक्तींच्या तब्येतीचीही त्यांनी चौकशी केली. तसेच नवीन सुरू केलेल्या कारखान्याची परिस्थिती जाणून घेतली. उत्पादित मालाची बाजारपेठ, मिळणारा दर, रिकव्हरी आदींविषयी चौकशी केली. 

या वेळी रावसाहेब पाटील, शेखर पाटील, शहाजीराव पाटील, धैर्यशील पाटील, अमर पाटील, श्री. पाटील, प्रसाद पाटील, आशिष पाटील आदी पाटील कुटुंबीय उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sharad Pawar said, Patil family will always be my love