
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वीट येथे महावितरणकडून वीजबिल वसुली करताना वाड्या- वस्त्यांवरील ज्या ग्राहकांनी वीजबिल 100 टक्के भरले आहे, त्याही ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ण दिवसभर बंद करून ठेवला जात आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना महावितरणने तुघलकी कारभार करत वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचाही वीजपुरवठा बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पिण्याच्या पाण्यासाठीचीही वीज बंद असल्याने जनावरे व माणसांचे हाल सुरू आहेत. वीट सबस्टेशनचे अभियंता सुनील पवार मात्र लोकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
दिवसेंदिवस उष्णता वाढत चाललेली आहे. उकाड्याने लोक हैराण झालेले असताना वीजबिल भरूनही केवळ अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे लोकांना बिल भरूनही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सरसकट वीज बंद करून वीजबिल वसुलीचा महावितरणने सपाटा लावल्याने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा घरगुती वीजपुरवठा बंद केल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेल्या लोकांचे मोठे हाल होत आहेत. वीट सब स्टेशनवरून कोर्टी व वीट असे दोन फिडर असून गेल्या आठ दिवसांपासून दिवसभर वीजपुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे विहाळ, वीट, मोरवड या भागातील लोकांचे हाल होत आहेत.
वीज बिलासाठी वीज कनेक्शन सोडले तरी पिण्याच्या पाण्यासाठी दररोज एक तास कृषी पंपाची वीज दिली जाते. मात्र दोन दिवसांपासून कसलीच वीज आली नसल्याने जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.
याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुनील पवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन कायम बंद असतो. तर करमाळा कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांना संपर्क केला असता संबंधितांना तत्काळ घरगुती वीज सुरू करण्यास सांगतो, असे सांगितले मात्र त्याची कार्यवाही झाली नाही.
वीट (ता. करमाळा) येथील महावितरणच्या सबस्टेशनच्या एका फिडरवरून गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना एक दिवसाआड वीजपुरवठा केला जात असताना वीज वसुलीसाठी मात्र महावितरणकडून तगादा लावला जात आहे. हे अन्यायकारक असून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांनी केली आहे.
वीट फिडरवर 76 डीपी असून दोन वर्षांपासून एक दिवसाआड वीजपुरवठा होत आहे. अंजनडोह, जांभुळ झरा, जगदाळे वस्ती, गणगे वस्ती, गाडे वस्ती, वंजारवाडी या भागातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. विशेष म्हणजे घरगुती वीजही बंद केली जात आहे. वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर आंदोलन केले जाईल.
- विठ्ठल जाधव,
वीट, ता. करमाळा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.