महावितरणचा गलथान कारभार ! मंगळवेढ्यात विजेचा धक्का लागून आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी 

हुकूम मुलाणी 
Tuesday, 27 October 2020

वीज दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केला असताना, अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरणचा गलथान कारभारामुळे आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : वीज दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केला असताना, अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरणचा गलथान कारभारामुळे आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. 

मंगळवेढा शहराच्या पश्‍चिम भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी बिलाल अब्दुलकादर शेख (वय 26, रा. लवंगी) हे कार्यरत होते. त्यांच्यावर शहरातील शनिवार पेठ, मुरलीधर चौक आदी भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिलाल शेख हे विजेच्या खांबावर चढून आपले काम करीत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले व भाऊ असा परिवार आहे. शेख यांच्या मृतदेहावर लवंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महावितरणच्या गलथान कारभारामुळे यापूर्वी खुपसंगी येथे कंत्राटी वीज कामगार तसेच चिक्कलगी येथे हुन्नूर वीज सबस्टेशनचा ऑपरेटर वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्यामुळे बळी गेल्याने त्यांचे कुटुंबे उघड्यावर पडले. 

दरम्यान, लवंगीतील बिलाल शेख या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आमदार भारत भालके यांनी तत्काळ लवंगी येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे, बसवराज पाटील, आमदार भालके यांचे स्वीय्य सहाय्यक रावसाहेब पटेल, महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

महावितरणमध्ये नोकरी व त्यांना देय असलेली विमा रक्कम तत्काळ द्यावी, अशा सूचना आमदार भारत भालके यांनी अधीक्षक अभियंता यांना दूरध्वनीवरून केल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL employee dies due to sudden power supply