esakal | वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित ! अतिरिक्त कामाचा बोजा ठरतोय जीवघेणा
sakal

बोलून बातमी शोधा

Electrician.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये मंगळवेढा तालुक्‍यातील महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने महावितरणचे कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित ! अतिरिक्त कामाचा बोजा ठरतोय जीवघेणा

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : अलीकडच्या काही दिवसांमध्ये मंगळवेढा तालुक्‍यातील महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने महावितरणचे कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. 

तालुक्‍यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे वीज सबस्टेशनची संख्यादेखील वाढली आहे. अशा परिस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. परंतु, आवश्‍यक त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध केले नाही. अशा परिस्थितीत मंगळवेढा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवताना त्यांना जीव धोक्‍यात घालावे लागत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांकडून होणाऱ्या त्रासालाही सामोरे जावे लागते आणि ग्राहकांकडून थकीत बिलाची वसुली करताना विलंब झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्वास्थ्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 

अशा परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन गावांचा कारभार आहे. त्यामध्ये महावितरणने ग्राहकांना वीज पुरवठा करताना सिंगल फेज आणि थ्री फेज अशी स्वतंत्र लाइन टाकून वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे विजेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन्ही फिडर बंद ठेवावे लागतात. दुरुस्तीसाठी विलंब झाल्यास मात्र ग्राहकांकडून "जो भाग बंद आहे तोच भाग बंद ठेवावा, उर्वरित भाग का चालू ठेवला नाही' असे शाब्दिक प्रहार सहन करावे लागतात. 

कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य, पोलिस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकेच ताकदीने काम करत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या कामाबद्दल कुठेही कौतुकाचे दोन शब्द व्यक्त केले जात नाहीत, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शिवाय वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कायम कर्मचारी सामोरे जातात; परंतु महावितरणच्या सबस्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारी हे आउटसोर्सिंगचे आहेत. त्यांना महावितरणमधील बहुतांश कामांचा अनुभव नसतो. त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा एखादी चूक घडल्यानंतर महावितरण त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. 

एकाच कर्मचाऱ्याकडे जास्त गावे असल्यामुळे बिघाड दुरुस्ती करण्यासाठी चक्क ऑपरेटरला ते काम करावे लागले. त्यात त्याचा बळी गेल्यानंतर त्याची जबाबदारी त्याच्यावर ढकलण्यात येते. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महावितरण या कुटुंबांकडे कसलेच लक्ष दिले नसल्याची नाराजी त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली. परंतु तालुक्‍यात महावितरणमध्ये असलेली रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची यादी प्रसिद्ध झाली; परंतु त्यांना नियुक्तिपत्र न दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. त्यांना नियुक्तिपत्र दिल्यास सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण काही अंशी कमी होणार आहे. 

मागील पाच वर्षांच्या काळात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आमदार भारत भालके यांच्या मतदारसंघात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले; परंतु सध्या आमदार भालके हे सत्ताधारी पक्षाचे आहेत; किमान तालुक्‍यामध्ये असलेली महावितरणची रिक्त पदे भरावीत, कामामध्ये योग्य सुसूत्रता आणावी, स्थानिक कर्मचाऱ्यांना कामाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल