Marhan
Marhan

"आई जेवू देईना अन्‌ बाप भीक मागू देईना !' अधिकारी व ग्राहकांच्या रोषाला सामोरे जाताहेत महावितरणचे कर्मचारी

Published on

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : लॉकडाउन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्ष गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सुरू आहे. मात्र तरीदेखील मार्च अखेर असल्याने महावितरणचे कर्मचारी घरगुती व औद्योगिक वीजबिल वसुलीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहेत. त्यातच शासनाने कृषी पंपाचीही वसुली करण्यासाठी सांगितल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना एकीकडे वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, दुसरीकडे वसुली होत नसल्याने अधिकाऱ्यांचा रोषही पत्करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची अवस्था "आई जेवू देईना अन्‌ बाप भीक मागू देईना' अशी झाली आहे. 

गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, सर्वत्र रस्त्यांवर बाजारपेठेत मार्च, एप्रिल, मे महिन्यात शुकशुकाट असताना, महावितरणचे कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून नागरिकांना अखंडित वीज पुरवठा करत होते. लॉकडाउन नंतरच्या काळात आलेली वाढीव बिले ग्राहकांनी भरण्यास मनाई केली. त्या बिलांचे निराकरण करण्यासाठी महावितरणने वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी महावितरणच्या कार्यालयात उपलब्ध करून दिल्या. परंतु वाढीव बिलासंदर्भात शासन एका मतावर ठाम नसल्याने व बिलासंदर्भात सातत्याने वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्याने ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी वीजबिले भरण्यास टाळाटाळ केली. त्यातच वादळी वारे, अतिवृष्टीमुळे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. 

कंपनी आर्थिक अडचणीत आल्याने वीजबिल वसुलीशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने, डिसेंबर महिन्यापासून महावितरणच्या वतीने "बिल भरा अन्यथा कनेक्‍शन कट' अशी कडक मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वाढीव बिलावरून ग्राहकांकडून रोष पत्करावा लागला. अनेक ठिकाणी वीज जोडणी, तोडणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माराहाणही करण्यात आली. तर काही ठिकाणी अरेरावीची भाषा वापरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देण्यात आली. तर काही उच्चशिक्षित नागरिकांकडून कोर्ट केस करेन, पोलिस केस करेन अशाही विविध प्रकारच्या धमक्‍या देण्यात आल्या. तरीही कर्मचारी डगमगले नाहीत. कंपनीच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी वसुलीत सातत्य ठेवले. 

आता मार्चअखेर असल्याने घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वसुली पूर्ण करून निवांत व्हावे, अशी मानसिकता कर्मचाऱ्यांची असताना, ऐनवेळी शासनाच्या वतीने वीज पंपाच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांवर तगादा लावला जात आहे. ही वसुली करत असताना मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना आदेशावर आदेश दिले जात आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा रोष त्याचबरोबर शेतकरी संघटना, भाजप व सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा वीज तोडणीसाठी असलेला विरोध यामुळे महावितरणचा कर्मचारी यातच भरकटला जात असून, दुहेरी संकटात सापडला आहे. 

महावितरणच्या अधिकाऱ्यांचा आदेश आहे, वसुली करा, मात्र नागरिकांचा वीजबिल वसुलीला विरोध होत आहे. वसुली नाही केली तर अधिकाऱ्यांच्या रोषास तर वसुलीला गेलो तर नागरिकांच्या संतापाला आम्हा कर्मचाऱ्यांना जावे लागत आहे. काही ठिकाणी तर आम्हा कर्मचाऱ्यांना मारहाणीच्याही घटना घडल्या आहेत. मधल्या मध्ये कर्मचाऱ्यांना या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोणी तरी आम्हा कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात, हीच अपेक्षा. 
- महावितरणचा एक कर्मचारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com