
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर असलेल्या थकबाकीमुळे महावितरणच्या आर्थिक अडचणी वाढल्या असल्याने, माढा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या वतीने गावोगावी जाऊन घरगुती, औद्योगिक व शेतीपंपाची बिले तातडीने भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या कृषी पंप योजनेची माहिती दिली जात असून, शेतकऱ्यांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते. याचा फटका सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या कंपन्यांना बसला आहे. याचाच एक भाग म्हणजे महावितरण. या कंपनीला गेल्या वर्षभरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. वाढीव बिल आल्याने ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. तर दुसरीकडे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अशा दुहेरी संकटाचा सामना झाल्याने महावितरण कंपनीच्या समस्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने घरगुती, औद्योगिक, शेतीची विजबिले तातडीने भरण्यासाठी आवाहन करण्यात आले असून, वीज बिले भरा अन्यथा कनेक्शन कट असाही इशारा दिला आहे.
तसेच महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून, कृषी संजीवनी योजने अंतर्गत निम्मी बिले माफ करण्याचे आश्वासन दिले असून, 50 टक्के बिले भरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या योजनेतील कृषी पंपधारकांची झालेल्या वसुलीतून 33 टक्के रक्कम ही ग्रामपंचायत क्षेत्रातील विजेच्या पायाभूत सुविधा व सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. तर आणखी 33 टक्के रक्कम ही जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा व सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
माढा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेश लोखंडे, सहाय्यक अभियंता वैभव पळसकर, शुभम धारूरकर, मृणाली मसराम, प्रिया राठोड हे गावोगावी जाऊन या योजनेची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करीत आहेत. महावितरणच्या या योजनेला गावोगावी स्थानिक नेते मंडळी व शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
विद्युत पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी व ग्रामपंचायतच्या विकासासाठी तसेच विद्युत पुरवठा बंद करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिले भरणे गरजेचे असून, कृषी पंपाच्या या योजनेत शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदवून योजनेचा लाभ घ्यावा.
- महेश लोखंडे,
उपकार्यकारी अभियंता, महावितरण माढा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.