esakal | मुंबई, पुण्यात रुग्ण जास्त तरी दारु विक्री, मग सोलापुरात का नाही? 
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai and pune has given permission to wine shop then why not in Solapur district

कोरोना रुग्णांची संख्या जास्ती असलेल्या अनेक जिल्ह्यात वाईन शॉप सुरू करण्यात आले आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र जिल्ह्यात वाईन शॉप, परमीट रूम उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नसल्यामुळे आता दारू पिणाऱ्यांच्याबरोबरच दारू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये देखील अस्वस्थता वाढली आहे.

मुंबई, पुण्यात रुग्ण जास्त तरी दारु विक्री, मग सोलापुरात का नाही? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना रुग्णांची संख्या जास्ती असलेल्या अनेक जिल्ह्यात वाईन शॉप सुरू करण्यात आले आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र जिल्ह्यात वाईन शॉप, परमीट रूम उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नसल्यामुळे आता दारू पिणाऱ्यांच्याबरोबरच दारू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये देखील अस्वस्थता वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात दारू विक्रीस बंदी असल्याने शासनाला महसुलातून मिळणाऱ्या साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. कर्नाटक आणि अन्य जिल्ह्यातून अवैध मार्गाने दारू म्हणून चौपट दराने विक्री सुरू आहे, असा आरोप वाईन शॉप आणि परमिट रूम मालकांकडून केला जात आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूर जिल्ह्यात वाईन शॉप, देशी दारू दुकान, परमिट रूम आणि बिअर शॉपीच्या माध्यमातून  व्यवसाय करणारे सुमारे अकराशे व्यावसायिक आहेत.  या सर्वांनी मिळून 2020 -2021 या वर्षासाठी सुमारे 12 कोटी रुपये लायसन्स फी भरलेली आहे. या सर्व दुकानांमध्ये कामगार, वेटर असे सुमारे आठ ते दहा हजार लोक काम करतात. सुमारे अडीच महिन्यांपासून दुकाने बंद असल्यामुळे हे लोक आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी कुटुंबे अडचणीत आली आहेत.
मुंबई, पुणे, औरंगाबाद याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तरीही शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची अट घालून तेथील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या सर्व जिल्ह्यात वाईन शॉप सुरू करण्यात आली आहेत. तथापि सोलापूर जिल्हा प्रशासनाने मात्र दुकाने बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. अनेक प्रकारे प्रयत्न करून देखील परवानगी मिळत नसल्यामुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून वाईन शॉप, परमिट रूम बंद असल्यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच वाईन शॉप, बिअर शॉपी आणि परमिट रूममध्ये मोठ्या प्रमाणात बिअर चा साठा आहे. बिअरला एक्सपायरी कालावधी सहा महिने असतो. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये खरेदी केलेला बिअरचा मोठा साठा खराब होऊन त्याचाही आर्थिक फटका संबंधित व्यावसायिकांना बसणार आहे.
जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी असली तरी कर्नाटक आणि लगतच्या जिल्ह्यातून अवैधरित्या दारू आणून विकली जात आहे. या अवैध दारू विक्रीच्या चेनमध्ये अनेकजण असल्यामुळे किमतीपेक्षा चौकट दराने दारू विकली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून डुप्लिकेट दारू विक्री देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा आरोप जिल्ह्यातील वाईन शॉप आणि परमिट रूम मालकांकडून केला जाऊ लागला आहे. वाईन शॉप व परमिट रूम बंद असल्यामुळे अनेक लोक नाईलाजास्तव अवैध मार्गाने उपलब्ध होणारी डुप्लिकेट दारू पीत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे असाही दावा लोकांच्या आरोग्याचा विचार न करता नेहमी दारू विकणाऱ्या दुकानदारांकडून तसेच वाईन शॉप आणि परमिट रूम मालकांकडून केला जात आहे. हा आरोप खरा असेल आणि डुप्लिकेट दारूची विक्री होत असेल तर ही बाब निश्चितच गंभीर आहे. अनेक वेळा प्रयत्न करून देखील जिल्हा प्रशासनाकडून वाईन शॉप आणि परमिट रूम सुरू करण्यास परवानगी मिळत नसल्यामुळे संबंधित व्यवसायिक हैराण झाले आहेत.