नगरसेवकांच्या हाकलपट्टीमुळे घडणार चमत्कार ! 'स्थायी'त एमआयएमला लॉटरी; परिवहनमध्ये शिवसेनेला फटका 

3Solapur_Municipal.jpg
3Solapur_Municipal.jpg

सोलापूर : विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपला मदत केल्याबद्दल एमआयएमच्या एका नगरसेविकेची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे, तर शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी पक्षांतर केले असून एका नगरसेविकेचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीदरम्यान आनंद चंदनशिवे यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांची 'बसपा'तून हाकलपट्टी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर एमआयएमला स्थायी समितीत दोन सदस्य होतील तर परिवहनमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य वाढेल, अशी चर्चा आहे.

सदस्य निवडीचे असे आहे गणित... 
महापालिकेत एकूण 102 नगरसेवक असून त्यातून स्थायी समितीसाठी 16 तर परिवहन समितीसाठी 12 सदस्यांची निवड केली जाते. भाजपकडे 49 नगरसेवकांचे संख्याबळ असून दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेकडे सध्या 19 नगरसेवक आहेत. कॉंग्रेसकडे 14, एमआयएमकडे आठ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे चार नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीचे तीन नगरसवेक असून महापालिका निवडणूक झाल्यानंतर बहुजन समाज पार्टीचे चार नगरसेवक होते. त्यातील एका नगरसेविकेने भाजपमध्ये प्रवेश केला असून उर्वरित तीन नगरसेवक वंचित बहूजन आघाडीत गेले आहेत. त्यांच्या गटाला अद्याप मान्यता नसल्याने ते सर्वजण अपक्ष म्हणून गणले जातील, अशी शक्‍यता आहे. 102 नगरसेवकांमधून स्थायी समितीसाठी सदस्य निवड करताना पक्षीय बलाबलानुसार 6.375 पॉईंटसाठी एक सदस्य निवडला जाणार आहे. तर परिवहनसाठी 8.5 पॉईंटला एक सदस्य निवडला जाईल, असे सूत्र सांगितले जात आहे. 

महापालिकेची वर्षाअखेरची सर्वसाधारण सभा उद्या (ता. 20) होणार आहे. या सभेत परिवहनच्या 12 तर स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. भाजपला 49 नगरसेवकांसाठी स्थायी समितीत आठ सदस्य निवडता येणार आहेत, तर कॉंग्रेसला दोन, शिवसेनेचे तीन, एमआयएमचे दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य निवडला जाईल. पहिल्या फेरीत भाजपला सात, शिवसेना, कॉंग्रेसला प्रत्येकी दोन, एमआयएमला एक सदस्य निवडता येणार आहेत. दुसऱ्या फेरीत सर्वाधिक पॉईंटनुसार भाजप, शिवसेना व एमआयएम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक सदस्य निवडता येईल. दुसरीकडे परिवहन समितीसाठी पहिल्या फेरीत भाजपला पाच, शिवसेनेला दोन, कॉंग्रेसला एक सदस्य निवडता येणार आहे. त्यानंतर पॉईंटनुसार भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम आणि शिवसेनेला प्रत्येकी एक सदस्य निवडण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. एकंदरित पक्षातून हाकलपट्टी केलेल्या नगरसेवकांमुळे स्थायी समिती व परिवहन समितीचे सदस्य व सभापती निवडताना 2018 ची परिस्थिती राहणार नाही. पक्षीय बलाबलानुसार निश्‍चितपणे चमत्कार घडेल, अशीही चर्चा सुरु असून उद्या (शनिवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचा गोंधळ पहायला मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com