मुर्तींचे संकलन, विसर्जन करणार महापालिका 

प्रमोद बोडके
Saturday, 29 August 2020

महापालिकेच्यावतीने प्रत्येक झोनच्या कार्यक्षेत्रामध्ये गणेश मुर्ती संकलीत करण्याची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. याबाबतची माहिती गणेश मंडळानी त्यांच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडून घ्यावी. मध्यवर्ती मंडळांच्या विभागातील लहान मुर्तींचे घरच्या घरीच विसर्जन करण्याचे व मंडळाचे गणपती मुर्तीचे महापालिकेने ठरवून दिलेल्या संकलनाच्या ठिकाणी मुर्ती सुपूर्त करण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. 
- पी. शिवशंकर, आयुक्त 

सोलापूर : कोरोनाच्या संकटात यंदा गणेशोत्सव अडकला. गणरायाला निरोप द्यायचा कसा? याबद्दल जनमानसात कमालीचा संभ्रम होता. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर व महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा संभ्रम दूर करण्यात आला आहे. प्रत्येक झोनमध्ये मुर्ती संकलन केंद्रातून गणरायाच्या मुर्तींचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी 110 केंद्र स्थापन केली जाणार आहेत. संकलित केलेल्या मुर्तींचे विसर्जन तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या मालकीच्या मंठाळकर वस्ती येथील खाणीमध्ये केले जाणार आहे. हिंदू शास्त्राप्रमाणे या ठिकाणी श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

त्या त्या झोनच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांसह झोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील मध्यवर्ती महामंडळासोबत बैठक घेऊन पुढील उपायययोजना करण्याची सूचना आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली. धर्मवीर संभाजी तलाव व सिध्देश्‍वर तलाव परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी परवानगी दिली जाणार नाही. विसर्जनाच्या नियोजनासाठी दोन विभागीय कार्यालयासाठी प्रत्येकी एक सहाय्यक आयुक्त नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.

या बैठकीस उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेते श्रीनिवासकरली, नगरसेवक नागेश वल्याळ, सुभाष शेजवाज, आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त अजयसिंह पवार, नगर अभियंता संदिप कारंजे, सहा.आयुक्त श्रीराम पवार, विक्रमसिंह पाटील, झोन अधकारी मोहन कांबळे, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ सज्जन, उपाध्यक्ष गौरी शंकर जक्कापुरे, सेक्रेटरी रवी माने, पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गड्डम, निलम नगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवशंकर अजनाळकर, इको फ्रेंडली क्‍लबचे अध्यक्ष परशुराम कोकणे, विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद गोटे, महिला प्रमुख नमिता थिटे, अध्यक्ष मधुमती चाटे उपस्थित होत्या. 

महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे

कोरोनाचे संकट अद्यापही असल्याने आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. गणरायाला विधीवत निरोप देण्यासाठी महापालिकेच्यावतीने तयारी सुरु केली आहे. गणेश भक्तांनी व मंडळांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे. 
- श्रीकांचना यन्नम, महापौर 

विसर्जनाची गर्दी टाळणे आवश्‍यक

सध्या शासनाने विसर्जनाच्या बाबतीत कोरोना प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीने घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करावे अशी सुचना दिली आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी याच उपायाचा अवलंब करावा असे वाटते. ज्यांना शक्‍य नाही त्यांना परिसरातील गणेश मंडळांनी मुर्ती दानाची सोय करून द्यावी. मूर्ती दान केले तर घराबाहेर विसर्जनसाठी जाण्याची गरज राहणार नाही. शहरात सध्या कोरोना थोडाफार नियंत्रणात येऊ लागला आहे. त्यामुळे विसर्जनाची गर्दी टाळणे आवश्‍यक आहे. 
- गुरूलिंग कन्नूरकर, जवाननगर विजापूर रोड 

पीओपीचे गणपती मूर्तीदान

पर्यावरणपुरक गणपती घरी बसवला असेल तर तो घरातच विसर्जन करता येईल. तसेच पीओपीचे गणपती मूर्तीदान मनपाच्या माध्यमातून केले जावे. तसेच श्रध्दा कायम ठेवून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा विचार आता करणे गरजेचे आहे. पीओपीच्या मूती पर्यावरणपूरक नसल्याने त्या घरी विसर्जन होत नाहीत. गणपतीच्या बाबतीत अगदी सुपारी व घरातील धातुच्या मूर्ती दहा दिवस ठेवून त्याचे पूजन केले तरी कोणतीही अडचण नसते. मूर्तीदानासाठी मनपाने सर्व शहरात व्यवस्था करणे गरजेचे आहे. 
- विजय सहस्त्रबुध्दे, आसरा सोसायटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation will collect and immerse the idols