ऑनलाइन शिक्षणाचा मिटणार प्रश्न ! "स्मार्ट सिटी'तून होणार महापालिकेच्या 29 शाळा डिजिटल 

तात्या लांडगे 
Thursday, 24 September 2020

शहरातील विडी घरकूल, वस्त्रोद्योगातील मजूर, हातावरील पोट असलेल्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने शहरातील सुमारे साडेचार हजार मुलांना शिक्षण देणे कठीण झाले आहे. आगामी काळातील अशा संकटातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी आता स्मार्ट सिटीतून तीन कोटींचा खर्च करून महापालिकेतील 29 शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत. 

सोलापूर : शहरातील विडी घरकूल, वस्त्रोद्योगातील मजूर, हातावरील पोट असलेल्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने शहरातील सुमारे साडेचार हजार मुलांना शिक्षण देणे कठीण झाले आहे. आगामी काळातील अशा संकटातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी आता स्मार्ट सिटीतून तीन कोटींचा खर्च करून महापालिकेतील 29 शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत. 

कोरोनामुळे शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अशा स्पर्धेच्या काळात मुलांना शिक्षणाची गोडी कायम राहावी, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा या हेतूने गृहभेट, ऑनलाइन शिक्षण, सोशल मीडियातून व्हिडिओ पाठवून मुलांना शिक्षक शिकवत आहेत. मात्र, असे प्रसंग भविष्यातही निर्माण होतील या हेतूने आता उर्दू, मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. स्मार्ट सिटीकडून मिळणाऱ्या निधीतून स्मार्ट इन्टरॅक्‍टिव्ह बोर्ड, सरकारने तयार केलेला डिजिटल अभ्यासक्रम, गुणवत्ता आधारित स्पर्धा घेणारे स्वॉफ्टवेअर, मनोरंजनात्मक (ऍनिमेशन) अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी मोठा फायदा होईल, असा विश्‍वास महापालिकेच्या शिक्षण मंडळाने व्यक्‍त केला आहे. 

"या' शाळांमध्ये होणार डिजिटलायझेशन 
मनपा मराठी शाळा मुलांची संख्या क्र. चार, क्र. आठ, क्र. 26, मनपा उर्दू मुलांची शाळा कॅम्प, मुलींची शाळा कॅम्प, मनपा मुलांची प्रशाला कॅम्प, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 30, मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. तीन, मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. तीन, मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. एक, मनपा मराठी मुलांची शाळा हेडक्‍वॉर्टर, मनपा मराठी सुंदरबाई डागा शाळा, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. दोन, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 29, मनपा श्री रेवणसिद्धेश्‍वर कन्नड शाळा, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 21, मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. पाच, मनपा डी. एस. के. मराठी मुलांची शाळा, मनपा सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, मनपा उर्दू मुलांची शाळा चिरागअली, मनपा मराठी मुले शाळा, रामवाडी, मनपा मुलांची मराठी शाळा क्र. चार, मनपा मुलांची मराठी शाळा, मोदी, मनपा कन्नड मुलांची शाळा क्र. तीन (रामवाडी), मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 28, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 27, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. तीन आणि मनपा मुलींची उर्दू शाळा क्र. पाच. 

29 शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव 
महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख म्हणाले, महापालिकेच्या शाळांमधील सुमारे पाच हजार मुलांना टॅबची गरज आहे. त्यानुसार महापौरांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे- पाटील यांना पत्रही दिले. परंतु, अशा मुलांचा कायमस्वरुपीचा प्रश्‍न सुटावा यासाठी 29 शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. 

तीन कोटी रुपये दिले जातील 
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील म्हणाले, स्मार्ट सिटीतून महापालिकेच्या 29 शाळा डिजिटल केल्या जाणार असून त्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. तीन कोटींचा खर्च केला जाणार असून त्यातून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविला जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation's 29 schools will be digital through Smart City