महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता भोंगा लावणार शिस्त 

प्रमोद बोडके
Thursday, 22 October 2020

उद्यापासून होणार अंमलबजावणी 
महापालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (शुक्रवार, ता. 23) होणार आहे. याबाबतची कल्पना सर्वांना परिपत्रकाद्वारे देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. 

सोलापूर : विविध कामानिमित्त महापालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची कामे बहुदा वेळेवर होतच नाहीत. कर्मचारी त्यांच्या टेबलवर, त्यांच्या जागेवर सापडत नाहीत, या टेबलचे साहेब गेले कुठे? असाच प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. हातातील काम बाजूला ठेवून या टेबलचे साहेब गेले कुठे? याचा शोध घेण्याचे नवे काम सर्वसामान्यांना लागते. सर्वसामान्यांची हीच अडचण दूर करण्यासाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी महापालिका मुख्यालयात भोंगा (सायरन) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयामुळे महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचा नवा प्रयोग करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची नोंद घेण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. शिस्तीचे पालन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सायरन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी दुपारी दीड ते दोन ही वेळ जेवणासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. 

कर्मचारी ज्यावेळेस सकाळी पावणे दहा वाजता कार्यालयीन वेळेत कार्यालयात येतील त्यावेळेस सायरन वाजविण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता जेवणाची सुट्टी सुरू झाल्यानंतर व दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा सायरन वाजणार आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर सव्वासहा वाजता पुन्हा एकदा सायरन वाजविण्यात येणार आहे. या सायरनमुळे सर्वसामान्य लोकांना कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या, सुट्टीच्या वेळा याबद्दलची माहिती सहजपणे होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal employees will now be disciplined