
मोहोळ (सोलापूर) : नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (ता. 10) सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 6 फेब्रुवारी 2020 चा शासन निर्णय व त्यासंबंधित इतर शासनाच्या नियमांस अधीन राहून मात्रोश्री मीनाताई ठाकरे उद्यानाच्या प्रांगणात आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.
मोहोळ नगरपरिषदेमध्ये एकूण 17 प्रभाग असून आरक्षणाच्या सोडतीवरच विविध राजकीय पक्षांची तसेच सामाजिक संघटनांची निवडणुकीची आगामी रणनीती ठरणार आहे. सध्याच्या प्रभाग रचनेमध्ये आरक्षण पुढीलप्रमाणे आहे : अनुसूचित जाती (प्रभाग क्र. 5), अनुसूचित जाती स्त्री राखीव (प्रभाग क्र. 8, 9,) इतर मागासवर्गीय पुरुष (प्रभाग क्र. 3, 10) इतर मागासवर्गीय स्त्री राखीव (प्रभाग क्र. 1, 11, 14, 17), सर्वसाधारण (प्रभाग क्र. 2, 4, 6, 12, 16), सर्वसाधारण स्त्री राखीव (प्रभाक क्र. 7, 13, 15). तर उद्या (बुधवारी) काढण्यात येणाऱ्या आरक्षण सोडतीत कोणत्या प्रभागात कोणत्या जातीनिहाय आरक्षणाची सोडत निघेल, याची उत्कंठा राजकीय नेत्या - कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही लागली आहे.
विद्यमान नगरसेवकांकडून आपला प्रभाग आपल्याच ताब्यात कसा ठेवता येईल, याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची नावे आरक्षण सोडतीच्या अगोदरच अंतिम झाल्याची माहिती अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पसरविली आहे. तर येणाऱ्या निवडणुकीतही आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर करणार आहेत, हे मागील चार महिन्यांच्या त्यांच्या चाललेल्या राजकीय व सामाजिक हालचालीवरून दिसून येत आहे.
राष्ट्रीय कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, विद्यमान नगराध्यक्षा शाहीन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत "एकला चलो रे' म्हणत 17 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची पारंपरिक विरोधक असणारी शिवसेना दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेवर भगवा फडकाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर राष्ट्रीय पक्ष असणारा भाजप स्वतंत्रपणे जरी निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा बोलत असला तरी विविध पक्षांतील असंतुष्टांना सोबत घेत स्वतंत्र आघाडी करता येईल का, याची चाचपणी करीत आहे.
या प्रमुख राजकीय पक्षांची रणनीती ठरत असताना अनेक इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, "मला नाही तर त्यालाही नाही' अशी भूमिका घेत अपक्ष उभे राहण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. एकंदरीत, आरक्षणाच्या सोडतीवरच इच्छुक उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.