
सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला नगरपरिषदेतर्फे शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन माल खरेदीसाठी "नगरसेतू' हे ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. याद्वारे नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे, मेडिकल, पाण्याचे जार, दूध, चिकन/मटन या सर्व गोष्टी घरपोच मागवून घेता येऊ शकतील. या ऍपच्या वापरामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील खरेदीसाठी होणारी गर्दी कमी होईल, अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सांगोला नगरपरिषदेने याअगोदर शहरात विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये लॉकडाउनच्या काळात शहरातील व बाहेरगावाहून आलेले खरेदीदार, दुकानदार, शासकीय कर्तव्यावरील पोलिस व अन्य विभागांतील शासकीय कर्मचाऱ्यांना सतत हात धुण्यासाठी "हॅंडवॉश स्टेशन'ची निर्मिती करणारी राज्यातील पहिलीच नगरपरिषद म्हणून ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी सतत फवारणीही करण्यात येते. याअगोदरच फळे, भाजीपाला एकत्रित न विकता सोसायटीत, घरी पोच करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या घरपोच विविध प्रकारचा ऑनलाइन माल मिळवण्यासाठी शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी नगरपरिषदेने स्वतःचे नगरसेतू ऍप विकसित केले आहे. हे ऍप वापर करण्यासाठी अगदी सोपे आहे. हे ऍप चार ते पाच स्टेप्समध्ये इंस्टॉल होते. यामध्ये "होम डिलिव्हरी' देणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश आहे. ही ऑर्डर आपण सिलेक्ट केलेल्या दुकानदारास त्यांचे मोबाईलवरील व्हॉट्सऍपद्वारे मिळणार आहे. सर्व दुकानदार ऑर्डर तयार करून माल घरी पाठवतील. दरम्यान, आवश्यक असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. आपला नंबरसुद्धा त्यांच्याकडे जात असल्याने आवश्यकता पडल्यास दुकानदार आपणाला फोन करतील. तसेच हा माल पोच करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असल्याने त्याबाबतीत ग्राहकाला दुकानदारासोबत योग्य तो समन्वय ठेवावा लागेल. या ऑनलाइन माल खरेदी-विक्री संदर्भात शहरातील प्रमुख दुकानदारांची बैठक घेतली असून यापुढेही कायमच खरेदी-विक्रीसाठी या ऍपचा अधिकाधिक वापर करण्यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.