नागनाथ क्षीरसागर म्हणाले, हनुमंत मानेंना तक्रार करण्याचा काय अधिकार? 

प्रमोद बोडके
Thursday, 29 October 2020

दोन आठवड्यानंतर सुनावणी 
नागनाथ क्षीरसागर यांच्या हिंदू खाटीक या दाखला विरोधात झालेल्या तक्रारीवर आज पहिली सुनावणी सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समोर झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार असल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली. 

सोलापूर : मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या हिंदू खाटीक या अनुसूचित जातीच्या दाखल्या विरोधात मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर आज समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये क्षीरसागर यांनी वकिलांच्या माध्यमातून त्यांची बाजू मांडली. 

तक्रारदार हनुमंत माने यांनी केलेल्या तक्रारीची मला समितीमार्फत फक्त नोटीसच मिळाली आहे. या नोटीस सोबत तक्रारीची प्रत मला मिळालेली नाही. तक्रारदार माने हे इंदापूर तालुक्‍यातील शेळगाव येथील रहिवासी आहेत. मोहोळ मतदारसंघातील ते मतदार नाहीत त्यामुळे त्यांना माझ्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.

तसेच तक्रारदार माने हे जातीने हिंदू कैकाडी असून त्यांची जात ही विमुक्त जाती संवर्गामध्ये मोडते. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील आठ जिल्हे वगळता अन्य उर्वरित महाराष्ट्रामध्ये कैकाडी जातीचा समावेश विमुक्त जाती संवर्गात होतो. त्यामुळे यातील तक्रारदार हे अनुसूचित जातीचे नाहीत. त्यामुळेही माझा अनुसूचित जातीचा दाखला रद्द करून मागण्याचा त्यांना कोणताही कायदेशीर हक्क व अधिकार नसल्याचेही नागनाथ क्षीरसागर यांनी या सुनावणीत सांगितले. 

मला अनुसूचित जातीचा दाखला मिळाल्यामुळे तक्रारदार हनुमंत माने यांचे वैयक्तिक काय नुकसान झाले आहे? याबाबत त्यांनी समितीसमोर सबळ पुराव्यानिशी सिद्ध करणे आवश्‍यक आहे. मुळातच तक्रारदार हे अनुसूचित जातीचेच नाहीत, त्यामुळे त्यांना माझ्या जातीबाबत आव्हान देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तक्रारदार माने यांनी केलेली तक्रार रद्द करावी अशी मागणीही नागनाथ क्षीरसागर यांनी वकिलांच्या माध्यमातून आजच्या सुनावणीत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagnath Kshirsagar said, what is the right to complain to Hanumant Mane?