
सोलापूर : महाराष्ट्रातील नाट्यगृहे शासनाने विविध अटी आणि सूचना देऊन सुरू करण्यास परवानगी दिली असून, त्यानुसार नाट्य निर्माते संघाच्या वतीने निर्णय घेऊन नाटकांचे प्रयोग होत आहेत. नाट्यगृहात 50 टक्केच प्रेक्षकांना परवानगी राहणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी नाट्य परिषदेसह नाट्य व्यवस्थापन संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
लॉकडाउननंतर आता पुण्यामध्ये नाट्यप्रयोगाच्या तिकीट विक्रीचा प्रारंभ करण्यात आला आहे. 12 आणि 13 डिसेंबर रोजी यशवंतराव नाट्यगृह, बालगंधर्व आणि रामकृष्ण नाट्यगृह या ठिकाणी "एका लग्नाची दुसरी गोष्ट' या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. आता सोलापूरमध्येही नाटकाचे प्रयोग करायचे आहेत. सोलापूरच्या महापौर तसेच महापालिका आयुक्तांना भेटून नाट्यगृह लवकर सुरू करावे तसेच भाडे कमी करावे आणि स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी सांगितले.
यासंदर्भांत नाट्य व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले, की सध्या सर्वात स्वस्त सभागृह पुणे शहरात उपलब्ध आहे. एके काळी सर्वात कमी खर्च सोलापूरच्या प्रयोगासाठी येत असे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी 75 टक्के भाडे सवलत द्यावी. पिंपरी - चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहाचे भाडे 11 हजारावरून 2500 रुपयांवर आणले आहे. इतर शहरातील सभागृहांसाठी भाडे कमी करण्यात यावे, अशी आम्ही मागणी केलेली आहे.
यासंदर्भात नाट्य व्यवस्थापन संघाचे कार्याध्यक्ष गिरीश महाजन यांनी सांगितले, की सोलापूरमध्ये प्रत्येक प्रयोगासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. जरी ती परत मिळत असली तरी भाडे अधिक अनामत रक्कम ही प्रत्येक तारखेकरिता भरावी लागते. पूर्वी एकदा अनामत रक्कम भरली की वर्षभर तारखा बुक करता येत. आता जितके दिवस सभागृह हवे आहे तितकी अनामत रक्कम भरावी लागते. यामुळे वितरकांना प्रयोग सुरू करणे अशक्य होते, याचाही महापौर आणि आयुक्तांनी विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.