भोसे गाव झाले पोरके; राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन, कुटुंबातील तिसरा मृत्यू 

Rajubapu Patil
Rajubapu Patil

करकंब (सोलापूर) : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे रात्री एक वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. 1 ऑगस्ट रोजी त्यांचे चुलते अनंतराव पाटील तर 8 ऑगस्ट रोजी बंधू महेश पाटील यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता काळाने राजूबापू पाटील यांच्यावरच झडप घातली असून, भोसे गाव पोरके झाले आहे. संपूर्ण पंढरपूर तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. 

भोसे येथील पाटील घराण्याने शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून राजकीय वाटचाल चालू ठेवली होती. (कै.) यशवंतभाऊ पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर राजूबापू पाटील यांनी 2004 मध्ये अपक्ष म्हणून पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविताना 65 हजार मते मिळविली होती. शिवाय त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे सभापती म्हणून काम पाहिले होते. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले होते. सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहात असताना त्यांनी भोसे येथे स्वतःचा "कृषीराज शुगर' नावाचा कारखानाही काढला होता. त्याचे दोन गळीत हंगामही यशस्वीपणे पार पडले आहेत. 

राजूबापू पाटील दररोज सकाळी नऊ ते 12 हा तीन तासांचा वेळ केवळ ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देत असत. त्यामुळे येथील तक्रारी अभावानेच पोलिस ठाण्यापर्यंत जायच्या. पण आज त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने गावाचा पालनकर्ता हरपल्याने संपूर्ण गाव पोरके झाल्याची भावना परिसरात पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील, मुलगा उपसरपंच गणेश पाटील, एक भाऊ, मुलगी, जावई व चुलते असा परिवार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com