राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या पंढरपूर दौऱ्यावर 

अभय जोशी 
Monday, 28 September 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उद्या (मंगळवार, ता. 29) पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने श्री. पवार हे या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत, अशी माहिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सूत्रांकडून समजली. 

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उद्या (मंगळवार, ता. 29) पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज कैकाडी (जाधव) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने श्री. पवार हे या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत, अशी माहिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सूत्रांकडून समजली. 

माजी आमदार व सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक वर्षे श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर अनेक वर्षे श्री. पवार यांचे आणि श्री. परिचारक यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. श्री. पवार यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी म्हणून श्री. परिचारक यांची ओळख होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री. परिचारक यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली, परंतु तरीही अनेक वर्षे मिळून काम केलेले असल्याने दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध कायम होते. 

परिचारकांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे आणि त्यानंतर नुकतेच रामदास महाराज कैकाडी यांचेही निधन झाले. राजूबापू पाटील यांचे वडील (कै.) यशवंतभाऊ पाटील यांच्यापासून श्री. पवार यांचे पाटील घराण्याशी संबंध होते. राजूबापू पाटील हेदेखील श्री. पवार यांचे कट्टर समर्थक होते. 

रामदास महाराज कैकाडी यांचाही श्री. पवार यांच्याशी चांगला स्नेह होता. पंढरपूरमधील परिचारक, पाटील आणि कैकाडी (जाधव) यांच्यासारखे निकटचे सहकारी गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी श्री. पवार हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास खास पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. 

मंगळवारी दुपारी बारा वाजता पुण्याहून श्री. पवार हे मोटारीने पंढरपूर तालुक्‍यातील भोसे येथे येणार आहेत. कै. राजूबापू पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नंतर ते दुपारी एक ते दीड या वेळात पंढरपूर येथे कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या वाड्यात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते कैकाडी महाराज मठामध्ये कै. रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. 

दुपारी दोन वाजता श्री. पवार यांचे जिल्हा न्यायालयालगत आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आगमन होईल. दुपारी पावणेतीननंतर श्री. पवार हे मोटारीने बारामतीकडे रवाना होणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP president Sharad Pawar to visit Pandharpur tomorrow