पुणे शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी, शिवसेना माझ्यासोबतच माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांचा दावा 

प्रमोद बोडके
Wednesday, 18 November 2020

कृती समिती अभेद्यच 
राज्य कृती शाळा समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक लढविण्यासाठी बाबासाहेब पाटील हे स्वतः इच्छुक होते. त्यांनी तशी इच्छाही माझ्या जवळ व्यक्त केली होती. तुम्ही निवडणूक लढा असा सल्लाही मी त्यांना दिला होता अशी माहिती माजी आमदार सावंत यांनी दिली. लॉकडाऊनच्या अगोदर पासूनच ते आमच्यापासून दुरावले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मी मोजत नाही. कृती समिती आणि चळवळ ही पूर्वीही अभेद्य होती व आताही अभेद्द राहील. या निवडणुकीच्या निकालादिवशीच सर्वांना समजेल शिक्षक मतदार हे कोणासोबत आहेत, असा विश्वासही माजी आमदार सावंत यांनी व्यक्त केला. 

सोलापूर : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ संघात कॉंग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीकडून आपल्याला येथून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने माजी आमदार दत्तात्रय सावंत हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. माझ्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी नको म्हणून मी जास्त अट्टाहास केला नाही. या मतदारसंघातील राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते कुठे आहेत मला माहिती नाही परंतु या दोन्ही पक्षाच्या विचारांचा मतदार माझ्यासोबतच असल्याचा दावा माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी आज केला. 

सोलापूर "सकाळ'च्या कार्यालयाला त्यांनी आज सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, राज्य संघटक समाधान घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, जिल्हा संघटक राजेंद्र आसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार सावंत म्हणाले, तत्कालीन राज्यसरकारने कायम विना अनुदानित तत्वावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातील कायम शब्द वगळून या शाळांमधील शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी आमदारकीच्या कालावधीत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून आचारसंहितेमुळे शिक्षकांना हा लाभ मिळालेला नाही. 45 हजार शिक्षकांना माझ्या आमदारकीच्या माध्यमातून मला न्याय देता आल्याचे समाधानही माजी आमदार सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. 

फडणवीस हुशार पण निर्णय प्रक्रियेला विलंब, अजितदादा जागेवरच घेतात निर्णय 
शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी आमदार म्हणून काम करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या तिघांच्या कार्य कौशल्यची माहिती माजी आमदार सावंत यांनी यावेळी दिली. पृथ्वीराज चव्हाण व उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझा फारसा संबंध आला नाही. देवेंद्र फडणीस हे अत्यंत हुशार आहेत. कामाचा त्यांना कधीही कंटाळा येत नाही. कायम हसतमुख आणि सकारात्मक वृत्तीने काम करणारे ते नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक निर्णय घेतले परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी विलंब लागत होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्काळ निर्णय घेतात. अधिकारीही अजितदादांनी सांगितलेले काम म्हणून तत्काळ मार्गी लावतात असाच आपला अनुभव असल्याचे माजी आमदार सावंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP, Shiv Sena and former MLA Dattatreya Sawant claim in Pune Shikshak constituency