राष्ट्रवादीकडून कोठेंना मिळाले "उत्तर' ! मुलासह पुतण्या व समर्थक शिवसेनेतच; महापालिका निवडणुकीपूर्वी बदलणार समीकरणे 

pawar_kothe_uddhav
pawar_kothe_uddhav

सोलापूर : महापालिकेतील सर्वच पदे भूषविल्यानंतर आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या महेश कोठेंना आतापर्यंत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून कोठेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट झाल्यानंतरही कोठे यांना अधिकृत प्रवेश मिळाला नाही. मात्र, पक्षाकडून त्यांना अधिकृत प्रवेश दिला नसला, तरीही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने "उत्तर' दिले आहे. कोठेंनी आता शहर उत्तर मतदारसंघावर लक्ष द्यायला सुरवात केली आहे. 

शहर मध्य व शहर उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महेश कोठे यांचे प्राबल्य आहे. कॉंग्रेसमध्ये असताना कोठे यांच्या माध्यमातून महापालिकेवर सातत्याने कॉंग्रेसचीच सत्ता राहिली. कोठे यांनी 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून शहर उत्तर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची 52 हजारांहून अधिक मते मिळविली होती. त्यावेळी त्यांना दिवंगत शिवाजी पिसे, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी मदत केली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून मनोहर सपाटे यांनी निवडणूक लढविली आणि कोठे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्याकडून पराभूत झाले. आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने व शहर मध्य हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असल्याने स्वप्नपूर्तीसाठी शहर उत्तरशिवाय पर्याय नसल्याने कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरल्याचीही चर्चा आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरही महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहणार आहे. अमोल शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला असून, आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची मोठी मदत होईल, असा विश्‍वास पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना आहे. 

जुन्या पदाधिकाऱ्यांची करावी लागणार मनधरणी 
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, महेश गादेकर यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांची ताकद आहे. मात्र कॉंग्रेस, शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या कोठेंविरुद्ध नाराजी वाढली आहे. महापालिकेत कोठे यांच्या विरोधातील नाराजांची मनधरणी करण्याची जबाबदारी कोणत्या नेत्यांवर सोपवायला हवी, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात कोठे यांना भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांचा सामना करावा लागणार आहे. देशमुख आणि आमदार संजय शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत असल्याने त्यांची भूमिका काय राहणार, याकडेही लक्ष राहणार आहे. 

वडील राष्ट्रवादीत, पण मुलगा अन्‌ पुतण्या शिवसेनेतच 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती. आता कोठे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतील नेत्यांमुळेच मला 2019 मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकली नाही, त्यांच्यामुळेच मला पक्षाविरोधात बंडखोरी करावी लागली, असा आरोप कोठे यांनी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोठे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे बरडे यांनी त्याच वेळी स्पष्ट केले. आता त्यांचे चिरंजीव नगरसेवक प्रथमेश कोठे, पुतण्या देवेंद्र कोठे यांच्यासह महेश कोठे यांचे समर्थक नगरसेवक अद्याप शिवसेनेतच आहेत. वडिलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही मुलगा, पुतण्यासह अन्य नातेवाईक, समर्थक नगरसेवक शिवसेनेतच असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com