
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप जुळलेले दिसत नाही. परिवहन सभापती निवड, विषय समित्या निवडीतील मतभेदानंतर आता दलित वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील विकासकामांची यादी तयार करताना सत्ताधारी भाजपला शिवसेनेने साथ दिल्याचा आरोप अन्य गटनेत्यांनी केला आहे.
सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप जुळलेले दिसत नाही. परिवहन सभापती निवड, विषय समित्या निवडीतील मतभेदानंतर आता दलित वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील विकासकामांची यादी तयार करताना सत्ताधारी भाजपला शिवसेनेने साथ दिल्याचा आरोप अन्य गटनेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता शुक्रवारी (ता. 29) होणाऱ्या बजेट मीटिंगमध्ये विरोधी पक्षनेत्यांची उपसूचना नामंजूर करून आपली ताकद दाखविण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने डाव आखल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी भाजपच्या चार वर्षांच्या काळात नगरसेवकांना एकदाही ठरल्याप्रमाणे पुरेसा भांडवली निधी मिळू शकला नाही. दुसरीकडे, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. प्रभागातील कामे होऊनही मक्तेदारांची बिले पेंडिंग आहेत आणि त्यामुळे अनेकजण कामासाठी पुढे येत नसल्याचेही चित्र आहे. प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षांचे ओझे कमी करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे. मात्र, बहुतांश सर्वसाधारण सभांमधील सोयीच्या राजकारणामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच समजत नाही, अशीही चर्चा आहे.
परिवहन सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसला विश्वासात न घेता, परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ती समिती भाजपकडे गेली. विषय समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला व्हाईट वॉश देण्याची नामी संधी असतानाही भाजपला चार समित्या मिळाल्या. त्यानंतर दलित वस्ती सुधार योजनेच्या विषयावर सभागृहात शिवसेना आणि महेश कोठे यांनी आम्हाला मदत केली नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आणि नव्या आघाडीचा जन्म झाल्याचीही चर्चा आहे. कॉंग्रेसकडे 14, एमआयएमकडे नऊ, वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे प्रत्येकी चार नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे 20 नगरसेवक आहेत. शिवसेनेला वगळून सत्ताधाऱ्यांनी सूचना मांडल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची उपसूचना मंजूर होऊ न देण्यासाठी चार पक्ष एकत्रित आल्याचीही चर्चा आहे.
"स्थायी'त असणार शिवसेनेचे की कोठेंचे सदस्य?
शिवसेनेचे महापालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, त्यांनी ठरल्याप्रमाणे अमोल शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविले. आता महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीचा तिढा सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाला आहे. पुढील महिन्यात निवडणूक होणार असून तत्पूर्वी, समितीचे सदस्य निवडले जाणार आहेत. महेश कोठे हे शिवसेनेत असताना त्यांनी सांगितलेल्या नगरसेवकांना स्थायी समितीवर संधी मिळाली. गणेश वानकर यांनी काही दिवसांपूर्वी कोठे यांनी स्थायी समितीसाठी आपल्याला मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर विरोधी पक्षनेते अमोल शिंदे म्हणाले, महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे आता स्थायी समितीत कोठे यांनी सांगितलेले सदस्य असणार की विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी सुचविलेल्या नगरसेवकांना संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल