पोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश ! नियम मोडणारे दुकान सात ते चौदा दिवस बंद

तात्या लांडगे
Friday, 25 September 2020

आदेशातील ठळक बाबी...

 • नियमांचे पालन करण्याच्या अटीवर दुकानदारांना परवानगी देऊनही उल्लंघनच
 • कोरोनाग्रस्तांच्या संपर्कामुळे पुन्हा कोरोना वाढण्याची आहे भिती
 • कारवाई करुनही दुकानदार व ग्राहकांमध्ये होईना सुधारणा
 • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांना देऊ नये कोणताही माल तथा वस्तू
 • नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा सात दिवस तर दुसऱ्यावेळी 14 दिवस बंद करणार दुकान
 • शनिवार (ता. 26) ते 9 ऑक्‍टोबरपर्यंत आदेशाचे पालन करणे बंधनकारक

सोलापूर : शहरातील कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातून शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत असून विविध दुकानांना (आस्थापना) अटी व शर्थीसह परवानगी देण्यात आली. मात्र, कारवाई करुनही त्यांच्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ग्राहकांना वस्तू तथा माल देणारे तथा नियमांचे उल्लंघन करणारे दुकान प्रथम सात दिवसांसाठी आणि त्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास 14 दिवस संबंधित दुकान बंद ठेवले जाईल, असे आदेश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी (ता. 25) काढले.

आदेशातील ठळक बाबी...

 • नियमांचे पालन करण्याच्या अटीवर दुकानदारांना परवानगी देऊनही उल्लंघनच
 • कोरोनाग्रस्तांच्या संपर्कामुळे पुन्हा कोरोना वाढण्याची आहे भिती
 • कारवाई करुनही दुकानदार व ग्राहकांमध्ये होईना सुधारणा
 • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांना देऊ नये कोणताही माल तथा वस्तू
 • नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा सात दिवस तर दुसऱ्यावेळी 14 दिवस बंद करणार दुकान
 • शनिवार (ता. 26) ते 9 ऑक्‍टोबरपर्यंत आदेशाचे पालन करणे बंधनकारक

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र सरकारने कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात कोणीही येऊ नये म्हणून पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई केली आहे. सांघिक कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सध्या लॉकडाउन नियमांत शिथिलता आणली असून जनजीवन पूर्ववत झाले आहे. लॉकडाउन काळात बंद असलेल्या आस्थापनांना नियम व अटींसह परवानगी दिली आहे. मात्र, दुकानदारांसह ग्राहकांकडून त्या नियमांचे व अटींचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव पुन्हा वाढून लोकांच्या जीवास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव्या आदेशानुसार कार्यवाही करणे दुकानदार व ग्राहकांसाठी बंधनकारक असल्याचेही पोलिस आयुक्‍तांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांसह ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New orders of Commissioner of Police! The shop that breaks the rules is closed for seven to fourteen days