"बोंबाबोंब'ला आले यश अन्‌ शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड ! "न्यू फलटण शुगर'ने दिली थकीत ऊसबिले 

दिनेश देशमुख 
Saturday, 14 November 2020

फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन दिवाळीच्या तोंडावर कारखान्याने सभासदांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा केली. 

बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन दिवाळीच्या तोंडावर कारखान्याने सभासदांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा केली. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कामाचे कौतुक करून पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला. 

माळशिरस तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर या कारखान्याला गाळपासाठी ऊस घातलेला होता. या उसाचे जवळपास सहा कोटी रुपये आजपर्यंत त्या कारखान्याकडे थकीत होते. यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा ऊस बिलाकरिता हेलपाटे घातले; परंतु कारखाना प्रशासन काही दखल घेत नव्हते. यातच हा कारखाना दुसऱ्या मालकाच्या ताब्यात गेलेला असल्यामुळे टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे माळशिरस तालुक्‍यातील थकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी न्यू फलटण शुगर कारखान्याकडे पैसे मिळण्याची आशा सोडून दिली होती. यादरम्यान थकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असलेले कन्हेर गावचे माजी सरपंच भारत माने यांनी याविषयी माळशिरस तालुक्‍यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा करून आंदोलनाच्या मार्गाने पैसे मिळविण्याचे ठरले. 

शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हाध्यक्ष महामूलकर यांच्या सहकार्याने माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी संघटनेच्या वतीने मागील महिन्यात न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी (ता. फलटण) या कारखान्यावर शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासाठी तीव्र स्वरूपाचे बोंबाबोंब व धरणे आंदोलन केले होते. या वेळी त्यांनी दिवाळीच्या अगोदर थकीत शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास कारखाना बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानुसार कारखाना प्रशासनाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्‍याने माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टनाला एक हजार रुपये जमा केले आहेत. 

माळशिरस तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि कोरोना महामारी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऐन दिवाळीच्या तोंडावर पैसे जमा झाल्याने येथील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने कन्हेर येथे माजी सरपंच व शेतकऱ्यांचे नेते भारत माने यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर व पदाधिकारी आहिल पठाण, समाधान काळे, प्रदीप ठवरे-पाटील, सोलापूर जिल्हा प्रसिद्धिप्रमुख श्रीनिवास कदम-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Phaltan Sugar gave sugarcane bill of farmers in Malshiras taluka