विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

तात्या लांडगे 
Thursday, 29 October 2020

तू मेंटल असून तुला रोग आहे, तुझा रोग आम्हाला लागेल, असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर : तू मेंटल असून तुला रोग आहे, तुझा रोग आम्हाला लागेल, असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

रुबीना वसीम शेख (रा. विष्णू नगर, नई जिंदगी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती वसीम अ. वाहिद शेख, रेहान अ. वाहिद शेख, अ. वाहिद शेख, रुबिना अ. वाहिद शेख (रा. रॉयल पॅलेस, तळेगाव दाभाडे, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

सासरच्यांनी, माझ्या वडिलांना आम्ही तुमच्या मुलीस नांदवू शकत नाही, तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जा, असे म्हणून माझा लहान मुलगा म. हुसेन याला ठेवून घेतले, असेही फिर्यादी रुबिना यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. तोगे करीत आहेत. 

बनावट कागदपत्राद्वारे जागेची विक्री 
बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर जागेची विक्री केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील वसंत पोतदार, स्वप्नील सुनील पोतदार, निखिल सुनील पोतदार, तत्कालीन तलाठी व तत्कालीन मंडल अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. संशयित आरोपींनी अनिल आप्पासाहेब भोपळे (रा. कावेरी सदन, मजरेवाडी) यांच्या मालकीच्या जुन्या फेरफारची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. त्यानंतर सुनील पोतदार, स्वप्नील पोतदार व निखिल पोतदार यांनी मिळून त्यांची नावे वारस म्हणून लावून घेतली. या मिळकतीतील काहीसा भाग सहदुय्यम निबंधक सोलापूर उत्तर यांच्या कार्यालयात वेळोवेळी हजर राहून फिर्यादी भोपळे यांच्या संमतीशिवाय खरेदी करून घेतला. तसेच भोपळे यांच्या मिळकतीवर अनधिकृतपणे तारेचे कंपाउंड उभे केल्यानंतर भोपळे यांनी त्याबद्दल संशयित आरोपींकडे विचारणा केली, त्या वेळी त्यांनी भोपळे यांना शिवीगाळ, दमदाटी करून जागेवर पाय ठेवला, तर पाय तोडू व तुला खल्लास करू, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. जगताप हे करीत आहेत. 

खासगी सावकारकीत घोडके पिता-पुत्रास उच्च न्यायालयातून जामीन 
2015 ते 2019 या कालावधीत शीतल वाईकर यांच्यासह संजय खंडागळे, सतीश गलांडे, गणेश काशीद यांनी दहा लाख रुपये सात टक्के व्याजाने खासगी सावकार सदाशिव घोडके याच्याकडून घेतली होती. कर्जाची मुद्दल व व्याजाची रक्कम घोडके यास परत करूनही शीतल वाईकर यास जिल्हा परिषद येथून पळवून नेऊन त्याच्या सासऱ्याच्या नावे असलेली जमीन दमदाटी देऊन खूषखरेदी करून घेतली होती. त्यानंतर सदाशिव घोडके व त्यांची मुले गोपीनाथ घोडके, प्रकाश ऊर्फ मुकेश घोडके यांनी व्याजासाठी तगादा लावला. त्यांच्या त्रासाला कंटाळून शीतल वाईकर यांनी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी ऍड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. संशयित आरोपींच्या वकिलांच्या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्‍यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात संशयित आरोपींतर्फे ऍड. थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड. एम. एच. म्हात्रे यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News of crimes committed in and around Solapur