वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ! आता निळकंठ करे आहेत जिल्हा उपनिबंधक 

अण्णा काळे 
Monday, 23 November 2020

बारावी शिक्षणानंतर रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदावर रुजू झालेले निळकंठ करे यांनी पुढील शिक्षण चालूच ठेवत मुक्त विद्यापीठातून बहि:स्थ विद्यार्थी म्हणून शिकत बीए ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 1996 साली राज्य सेवेची परीक्षा दिली. या परीक्षेत ते सहाय्यक निबंधक या पदावर रुजू झाले. 

करमाळा (सोलापूर) : गावोगावच्या विकास सेवा सोसायट्या फक्त कर्ज देण्यापुरत्याच मर्यादित न राहता सभासदांसाठी वेगवेगळ्या सेवा पुरवण्यासाठी पुढे आल्या पाहिजेत, त्यातून या सेवा सोसायट्या स्वबळावर उभे राहतील, या उद्देशाने सेवा सोसायट्यांना वेगवेगळे उद्योग उभा करायला लावणारे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी केलेल्या कार्याबद्दल शासनाने 2018 साली द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे. त्या वेळी ते नाशिक येथे जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सांगली येथे याच पदावर कार्यरत आहेत. 

विहाळ (ता. करमाळा) या गावचे निळकंठ करे यांनी शासकीय सेवेत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विहाळ येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक ज्ञानदेव करे यांनी त्यांना सैनिक स्कूल, सातारा येथे पाठवले. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर एफवायबीएस्सी करत असतानाच त्यांनी वन खात्याची परीक्षा दिली. वयाच्या 19 व्या वर्षी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून शासकीय सेवेत रुजू झालेले निळकंठ करे यांचे कार्य निश्‍चितच प्रेरणादायी आहे. 

1989 साली राज्य सेवेच्या घेण्यात आलेल्या वनखात्याच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. मध्य प्रदेश येथील बालाघाट या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग अमरावती जिल्ह्यातील प्रोजेक्‍ट टायगर मेळघाट येथे झाली. रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करत असताना मेळघाटमध्ये शिकारी करणाऱ्या आदिवासी लोकांना संघटित करून शिकारीपासून परावृत्त करणे,आदिवासी मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे यासाठी मार्गदर्शन करणे, शिकारी न करता आदिवासींनी इतर कामे केली पाहिजेत यासाठी त्यांनी मोठे काम उभारले होते. शिकारी करणाऱ्यांच्या विरोधात दहा वर्षांत जेवढे गुन्हे दाखल झाले नाहीत त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल करून योग्य दिशा देण्याचे काम केले. 

बारावीनंतर या पदावर रुजू झालेले करे यांनी पुढील शिक्षण चालूच ठेवत मुक्त विद्यापीठातून बहि:स्थ विद्यार्थी म्हणून शिकत बीए ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 1996 साली राज्य सेवेची परीक्षा दिली. या परीक्षेत ते सहाय्यक निबंधक या पदावर रुजू झाले. 

सहाय्यक निबंधक म्हणून त्यांनी पैठण, बार्शी, जळगाव या ठिकाणी काम केले. 2010 साली त्यांची जिल्हा उपनिबंधक पदी बढती झाली. जिल्हा उपनिबंधक म्हणून बुलडाणा येथे काम करत असताना बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील अनागोंदी कारभारामुळे रिझर्व्ह बॅंकेने बुलडाणा मध्यवर्ती बॅंकेचा परवाना रद्द केला होता. या बॅंकेवर प्रशासक म्हणून निळकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक म्हणून आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वसुली मोहीम राबवली. लोकांना सहकारी बॅंक टिकली पाहिजे यासाठी समजावून सांगितले आणि त्यातूनच रिझर्व्ह बॅंकेने बुलढाणा बॅंकेचा रद्द केलेला परवाना परत मिळवून दिला. या कामामुळे ही बॅंक वाचली. 

बुलडाण्यानंतर नाशिक येथे त्यांची बदली झाली. नाशिक या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष व संचालक यांच्या बैठका घेऊन विकास सेवा सोसायट्यांनी जिल्हा बॅंकेकडून कर्ज घ्यायचे आणि सभासदांना वाटायचे एवढेच काम न करता विकास सेवा सोसायट्यांनी स्वत:चे आर्थिक उत्पन्न तयार करून सभासदांना त्याचा लाभ द्यावा व सोसायट्या सक्षम कराव्यात यासाठी त्यांनी मोठी मोहीम उघडली. यातूनच अनेक विकास सेवा सोसायट्यांनी शेतीपूरक उद्योग सुरू केले. यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळाला आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वस्तू मिळाल्या. या कार्याची दखल घेत 2018 साली महाराष्ट्र शासनाने त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले 

सध्या ते सांगली येथे उपनिबंधक म्हणून काम करत असून, नाशिक या ठिकाणी जो उपक्रम राबवला तोच उपक्रम सांगली जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांसाठी राबवत आहेत. यातून सांगली जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्या सक्षम होऊ लागल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilkanth Kare who became a Range Forest Officer at the age of 19 is now the District Deputy Registrar