फसवणूक प्रकरणी डोंगरगावातील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल 

Fraud
Fraud

सोलापूर : कमी व्याजदरासह नाबार्डकडून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जादा दराने कर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवेढा तालुक्‍यातील डोंगरगाव येथील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद सोमनाथ सिद्धेश्वर साखरे (रा. भाळवणी) यांनी दिली. या फिर्यादीवरून तुळशीदास करांडे, विवेक खिलारे, जनार्दन गायकवाड, विशाल गायकवाड, देवा खिलारे, दादा माळी, प्रशांत पोरे, नागेश नरळे, वैशाली चंदनशिवे (सर्वजण रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (ता. मंगळवेढा) येथील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीचे तुळशीदास कारंडे व विवेक खिलारे यांनी पाच सदस्यांचा गट तयार करून गटातील सदस्याला दोन गायी खरेदीसाठी सात लाख रुपये दोन टप्प्यात कर्ज रूपाने देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याला 35 टक्के सबसिडी, नऊ टक्के व्याजदर सांगून गट स्थापन करण्यासाठी यशवंत तानाजी निळे यांची नियुक्ती केली. त्यानुसार गट स्थापन करण्यात आले. त्यास 100 रुपये स्टॅम्प, कोऱ्या व्हिड्रॉलवर सह्या करून घेतल्या. एका गटासाठी मंजूर झालेले कर्ज रुपये 3 लाख 50 हजार कर्ज खात्यावर जमा होताच दहा मिनिटात ते पैसे संस्थेने खात्यावर वर्ग करून घेतले. संस्थेकडे विचारणा केल्यावर ती रक्कम देण्यास टाळाटाळ करत त्यातील सुरवातीला 55 हजार रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी काही रक्कम दिली. या संस्थेस दूध घालून त्यातून कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. 

कोरोना काळातही हप्ता कपात करणे बंद का केल्याबाबत विचारले असता, बॅंका बंद आहेत, असे सांगण्यात आले. सहा महिन्यांनंतर पुढचा हप्ता देणार होता त्याचे काय झाले, असे विचारले असता, कोरोना संपला की देतो, असे सांगण्यात आले. कोरोना काळात संस्थेचा दूधदर इतर संस्थांपेक्षा कमी होता. कोरोना संपूनही दूध दरात वाढ न केल्याने फिर्यादीने स्वत: दुसरी खासगी संस्था सुरू करून दूध संकलन सुरू केले. त्या वेळी इतरांचे दूध येऊ लागल्याने जनार्दन भिकू गायकवाड, विशाल भिकू गायकवाड, देवा खिलारे, सचिन आकळे, विवेक खिलारे (रा. सर्वजण डोंगरगाव) यांनी फिर्यादीला फोन करून "तू आमच्याकडे येणारे दूध व फॅट चेक करतो' असे म्हणत फिर्यादीची डेअरी बंद पाडण्याची भाषा करत होते. तुमचा दूधदर कमी आहे, दर वाढवा, असे सांगितले असता "आम्हालाच मिळत नाही कोठून देऊ' असे सांगण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांनी फिर्यादीच्या घरी येऊन "बॅंकेचा हप्ता भरा, पण रोक रक्कम घेणार नाही, त्यासाठी दूध घाला, त्यातून हप्ते घेऊ' असे सांगितल्यावर "दूधदर वाढवून दिल्यास आम्ही दूध घालतो, नाहीतर नाही' असे फिर्यादीने सांगितले. 

त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी फिर्यादी व आईची अशी चार जनावरे एमएच 13 टीसी 176 व एमएच 13 सीयू 1079 या दोन गाड्यांतून घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावर बॅंकेचे कर्ज आहे, जनावरे घेऊन कसे जाता, असे विचारले असता "तुमचे सर्व पेपर आमच्याकडे आहेत,' असे सांगत चार जनावरे ओढून नेली. त्यातील महिला प्रतिनिधीने फिर्यादीच्या आईस शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर बॅंकेत चौकशी केली असता कर्ज रक्कम 7 लाख 43 हजार असल्याचे आढळून आले. गटास मंजूर असलेल्या 7 लाखांपैकी प्रत्येक सभासदास 1 लाख 40 हजारांमधील 64 हजार 750 रुपये मिळाले. 

फिर्यादी, त्याची आई व इतराची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराभ गुंजवटे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com