हंजगी प्रकरणातील नऊ रिपोर्ट अद्याप प्रलंबित 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

करमाळा तालुक्‍यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नगर येथून अनेक नागरिक आले आहेत. त्यांना ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीकडून होम क्वारंटाइन व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जात आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोटला रविवारी कोरोनाबाधित निघालेल्या चौघांच्या संपर्कातील नऊ लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. हंजगी (ता. अक्कलकोट) येथील लग्नातील वधूचा भाऊ हा कर्नाटकात बाधित झाला आहे. तसेच, हंजगीच्या लग्नाशी संबंधित वधू-वरांसह एकूण 16 लोकांना काल (सोमवारी) क्वारंटाइन करण्यात आले.

आज 40 जण क्वारंटाइन
आज पुन्हा त्याच्या संपर्कातील 22 जणांना क्वारंटाइन करण्यात आले. ग्रामीण भागात मुंबईहून आलेला एक जण व सोलापुरातील कोरोनाबाधित मुलीच्या संपर्कात आलेल्या वडिलांना क्वारंटाइन करण्यात आले. या सर्व 24 जणांचे स्वॅब व कालचे 16 असे एकूण 40 जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मरोड यांनी दिली.

हेही वाचा : सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या हजारी पार 

गरजेप्रमाणे स्वॅब घेण्यात 
गरजेप्रमाणे उद्या बुधवारी स्वॅब घेण्यात येणार आहेत. आता अक्कलकोट तालुक्‍याचे लक्ष हंजगीच्या स्वॅबच्या अहवालाकडे लागले आहे. अक्कलकोटला आजतागायत मृत व्यक्तीसह आठ जण एकूण कोरोनाबाधित आहेत. उर्वरित सात कोरोनाबाधित अक्कलकोटला कोविड केअर केंद्रावर उपचार घेत आहेत. 

होम क्वारंटाइन व्यक्तींवर गुन्हा 
करमाळा :
करमाळा तालुक्‍यात होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती त्याच ठिकाणी राहतात की नाही याची तपासणी केल्यानंतर क्वारंटाइन केलेल्या ठिकाणी राहत नसलेल्या सहा जणांवर करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारने बाहेरगावातील नागरिकांना पास काढून गावी जाण्यास सवलत दिली. त्याप्रमाणे करमाळा तालुक्‍यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नगर येथून अनेक नागरिक आले आहेत. त्यांना ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीकडून होम क्वारंटाइन व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जात आहे.

हेही वाचा : इशारा... आदेशाचे उल्लंघन करणारी सोलापुरातील रुग्णालये व दुकाने होणार सील (VIDEO)  

दिलेल्या ठिकाणी राहणे आवश्‍यक
क्वारंटाइन झालेल्यांनी दिलेल्या कालावधीत त्याच ठिकाणी राहणे आवश्‍यक आहे. करमाळा पोलिस ठाण्याकडील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करमाळा तालुक्‍यातील 21 गावे व शहरातील आठ वॉर्डमधील क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची तपासणी केली. तेव्हा वंजारवाडी, खातगाव नंबर दोन, जेऊर व मलवडी या चार गावांतील व्यक्ती क्वारंटाइन केलेल्या ठिकाणी न राहता इतरत्र सापडल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine reports in the Hanji case are still pending