मोठी ब्रेकिंग! मुख्याध्यापक अन्‌ लिपिकांना नाही कोरोना ड्यूटी; 'यांनी' घेतला निर्णय 

तात्या लांडगे
Wednesday, 26 August 2020

मुख्याध्यापक, लिपिक वगळता सर्व शिक्षकांना ड्यूटी बंधनकारक 
शहरातील 50 वर्षांवरील ज्या शिक्षकांना रक्‍तदाब, ह्दयरोग, ह्दय तथा किडनीसंबंधी आजार आहेत, त्यांना ड्यूटी दिलेली नाही. त्यानंतर आता शाळांमधील कामे वेळेत पूर्ण व्हावीत या हेतूने मुख्याध्यापक व लिपिकांची ड्यूटी रद्दचा निर्णय घेतला आहे. 
- पंकज जावळे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्याच्या अनुषंगाने घरोघरी को-मॉर्बिड व्यक्‍तींसह प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व्हेक्षण, कोविड कंट्रोल रुम, नाकाबंदी, रुग्णाचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या कामांसाठी शिक्षकांची नियुक्‍ती केली जात आहे. मात्र, शाळांचे व्यवस्थापन, मुलांचे ऑनलाइन शिक्षण आणि मूल्यमापन यासह अन्य कामांची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. त्यांच्या मदतीला लिपिकांची गरज असल्याने दोघांनाही कोरोना ड्यूटी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 30 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या दोनशे शिक्षकांना कार्यमुक्‍त करुन त्यांच्याजागी नव्या शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

शहरात खासगी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण विभाग, मनपा शिक्षण मंडळाअंतर्गत एकूण तीन हजार 803 मुख्याध्यापक, शिक्षक आहेत. आतापर्यंत 597 शिक्षकांनी कोरोनाची ड्यूटी केली आहे. ड्यूटीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधितांनी नव्याने नियुक्‍त होणाऱ्या शिक्षकाला काही दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना कार्यमुक्‍त केले जाते. ड्यूटी दिलेल्या शिक्षकांना शहरातील नागरी आरोग्य केंद्रावर दररोज हजेरी देणे बंधनकारक असून त्यांना दररोज किमान चार तासांचा सर्व्हे करावा लागतो. परंतु, 50 वर्षांवरील ज्या शिक्षकांना रक्‍तदाब, ह्दयरोग, ह्दय तथा किडनीसंबंधी आजार आहेत, त्यांचीही ड्यूटी रद्द करण्यात आली आहे. तरीही महापालिकेत दररोज 30 ते 40 शिक्षक हेलपाटे मारत असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ड्यूटी रद्दची मागणी करीत आहेत. मात्र, प्रत्येकांना कोरोना ड्यूटी करावीच लागेल, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. तत्पूर्वी, शहरातील एकूण शिक्षकांपैकी दोन हजार 900 शिक्षकांनी ड्यूटी केलेली नाही. त्यातील गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना वगळता सर्वांनाच ड्यूटी करावी लागणार असल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मुख्याध्यापक, लिपिक वगळता सर्व शिक्षकांना ड्यूटी बंधनकारक 
शहरातील 50 वर्षांवरील ज्या शिक्षकांना रक्‍तदाब, ह्दयरोग, ह्दय तथा किडनीसंबंधी आजार आहेत, त्यांना ड्यूटी दिलेली नाही. त्यानंतर आता शाळांमधील कामे वेळेत पूर्ण व्हावीत या हेतूने मुख्याध्यापक व लिपिकांची ड्यूटी रद्दचा निर्णय घेतला आहे. 
- पंकज जावळे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

 

शहरातील शिक्षकांची स्थिती
खासगी प्राथमिक
1,694
माध्यमिक शिक्षक
1,927
मनपा शिक्षक
182
कोरोना ड्यूटी न केलेले शिक्षक
2900


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No corona duty to headmaster and clerk