राज्यातील 'या' शहर-जिल्ह्यांमध्ये नो एन्ट्री! केंद्राच्या 'या' निर्णयाला राज्य देणार बगल...

तात्या लांडगे
रविवार, 31 मे 2020

जिल्हाबंदी उठवण्याबाबत काहीच निर्णय नाही

राज्यातील कोरण्याचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने राज्य सरकारने जिल्हाबंदी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने दोन जिल्ह्यात तथा दोन राज्यांमध्ये जाण्यासाठी ई-पासची गरज नाही, असे म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात राज्य शासनाकडून काहीच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तुर्तास तरी पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणीही दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ अथवा येऊ शकत नाही.
- मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, सोलापूर

सोलापूर : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत  लॉकडाऊन चारवेळा वाढवले. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने आता लॉकडाऊनचा  पाचवा टप्पा 30 जूनपर्यंत वाढविला आहे. केंद्र सरकारने दोन जिल्ह्यात व दोन राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नाही, असे म्हटले आहे. मात्र, त्या निर्णयाला बगल देत महाराष्ट्र सरकार राज्यातील 14 शहर-जिल्ह्यांमध्ये विनापरवाना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, 1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेची तिकिटेही महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत देण्यात आलेली नाहीत.

 

राज्यात आतापर्यंत 66 हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे राज्यभरात सहा लाख व्यक्तींच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले आहेत. दरम्यान, राज्यातील तब्बल साडेचार लाख संशयित व्यक्तींच्या नमुन्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. प्रत्येकी साडेचार हजार रुपये, याप्रमाणे आतपर्यंत तब्बल 214 कोटी रुपयांचा खर्च नुसत्या टेस्टवरच झाला आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान, या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक 13 ते 15 हजार संशयितांच्या कोरोना टेस्ट केल्या जातात. त्यासाठी दररोज 67 लाखांचा खर्च होतो आहे. हा खर्च टाळण्याच्या दृष्टीने ठोस उपाय म्हणून आणखी काही दिवस जिल्हाबंदी कायम ठेवली जाणार असून जिल्ह्यांअंतर्गत प्रतिबंधीत परिसर वगळता उर्वरित ठिकाणी टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरू केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याच्या दृष्टीनेही उपाय योजिले जाणार आहेत.

 

एकूण रुग्णांपैकी 95 टक्के रुग्ण याचठिकाणी

राज्यात आतापर्यंत सुमारे 66 हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी तब्बल 63 हजारांहून अधिक रुग्ण राज्यातील 14 शहरांमध्ये सापडले आहेत. त्यामध्ये मुंबई ई ठाणे पालघर नाशिक रायगड जळगाव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर औरंगाबाद अकोला नागपूर व रत्नागिरी या शहर- जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणचे रुग्ण कमी होइपर्यंत अथवा कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत विनापरवाना त्या ठिकाणी कोणालाही एन्ट्री दिली जाणार नाही. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे.

 

ऑरेंज झोनमध्ये चार जिल्हे

चौथ्या लॉकडाऊनपर्यंत रेड झोनमध्ये असलेले चार जिल्हे आता ऑरेंज झोनमध्ये ते पोहोचले आहेत. त्यामध्ये नंदुरबार, वाशिम, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असून नांदेड जिल्हाही रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करणार आहे.  सद्यस्थितीत (शनिवारपर्यंत) नंदुरबारमध्ये 11, वाशिममध्ये दोन, वर्ध्यात दहा तर चंद्रपूरमध्येही दहा आणि नांदेडमध्ये 16 ॲक्टिव (उपचार घेत असलेले) रुग्ण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No entry in 14 city-districts of the state! The state will ignore the Centres this decision .