कौतुकास्पदच ! स्वत:च्या चिमुकल्यांना घरी सोडून महापालिका शाळेतील मुलांसाठी शिक्षिकेची धडपड 

तात्या लांडगे
Monday, 25 January 2021

प्रशासनाच्या सहकार्यातून मुलांचे शिक्षण सुरु 
पहिली ते चौथीची शाळा कधी सुरु होणार हे अनिश्‍चितच आहे. महापालिकेतील गोरगरिब कुटुंबातील मुलेही आमच्या मुलांप्रमाणे शिकावीत म्हणून प्रशासन अधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या घरी तर कधी त्यांच्या परिसरात जाऊन नियमांचे पालन करीत शिक्षणाचे धडे दिले. कोरोनाबद्दल जनजागृती, स्वच्छता, संख्या ज्ञान, अक्षर ओळख अशा बाबींवर भर दिला. या कामात हेमलता देवनपल्ली, धानेश्‍वरी चौगुले, शहाबाज काझी यांचीही मदत झाली. 
- पंचशिला कांबळे, शिक्षिका, महापालिका मुलांची मराठी शाळा क्र. नऊ, सोलापूर 

सोलापूर : शाळा बंद, पण ऑनलाइन शिक्षण सुरु, असा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने सुरु केला. मात्र, महापालिका शाळांमधील ज्या मुलांकडे ऍन्ड्राईड साधने नाहीत, अशा मुलांसाठी महापालिका, स्मार्ट सिटीतून मदत न मिळाल्याने अनेक शिक्षक- शिक्षिकांनी स्वत:च्या मुलांप्रमाणेच शाळेतील मुलांना शिकवले. महापालिका मुलांची मराठी केंद्र शाळा क्र. 9 मधील पंचशिला कांबळे या शिक्षिकेने स्वत:ची चार वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा मुलगा घरी ठेवली आणि केंद्र शाळेचाही पदभार सांभाळून कोरोना काळात पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना कधी त्यांच्या घरी जाऊन तर कधी टेकडीवर तर मंदिरात वर्ग भरवून शिक्षणाचे धडे दिले.

प्रशासनाच्या सहकार्यातून मुलांचे शिक्षण सुरु 
पहिली ते चौथीची शाळा कधी सुरु होणार हे अनिश्‍चितच आहे. महापालिकेतील गोरगरिब कुटुंबातील मुलेही आमच्या मुलांप्रमाणे शिकावीत म्हणून प्रशासन अधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या घरी तर कधी त्यांच्या परिसरात जाऊन नियमांचे पालन करीत शिक्षणाचे धडे दिले. कोरोनाबद्दल जनजागृती, स्वच्छता, संख्या ज्ञान, अक्षर ओळख अशा बाबींवर भर दिला. या कामात हेमलता देवनपल्ली, धानेश्‍वरी चौगुले, शहाबाज काझी यांचीही मदत झाली. 
- पंचशिला कांबळे, शिक्षिका, महापालिका मुलांची मराठी शाळा क्र. नऊ, सोलापूर 

शहरात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच गेला. काही दिवसांतच सोलापूर शहर मृत्यू दरात राज्यात अव्वल झाले. त्यामुळे घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक घरात असलेले लोक घराबाहेर येणे बंद झाले. राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री, जलसंपदा मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांनी सोलापूरला भेट दिली. दुसरीकडे लॉकडाउन काळात घरी बसलेल्या मुलांना अनेक खासगी अनुदानित व शासकीय शाळांनी विविध प्रकारे ऑनलाइन शिक्षण द्यायला सुरुवात केली. मात्र, महापालिकेच्या शाळांमधील मुले तशी गोरगरिब कुटुंबातीलच, विशेषत: विडी घरकूल, मुस्लिम पाच्छा पेठ, रहिमतबी टेकडी, मुल्ला बाबा टेकडी परिसरातील हातावर पोट असलेल्यांच्या मुलांकडे ऍन्ड्राईड साधनेच नसल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत शिक्षकांनी खासगी शाळांमधील मुलांप्रमाणेच महापालिका शाळांमधील मुलांचे स्थान शिक्षणाच्या प्रवाहात कायम राखले. 

ना महापालिका, ना स्मार्ट सिटीतून झाली मदत 
महापालिकेच्या शाळांमधील बहुतांश मुलांकडे अथवा त्यांच्या पालकांकडे ऍन्ड्राईड साधने नाहीत. त्यामुळे त्यांना स्मार्ट सिटीतून ऑनलाइन शिक्षणाची सोय करुन द्यावी किंवा महापालिकेने काही मुलांना टॅब द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यावर काहीच निर्णय झाला नाही. एरव्ही भांडवली निधी अथवा अन्य निधीसाठी सभागृहात आक्रमक होणाऱ्या नगरसेवकांनी मुलांच्या शिक्षणाबाबत एक शब्दही काढला नाही. अशा परिस्थितीत शिक्षकांनीच पुढाकार घेत त्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना शक्‍य तितकी मदत केली आणि त्यामुळेच बहूतांश विद्यार्थ्यांची शिक्षणाची गोडी कायम राहिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No help from the administration! Leaving her own children at home, the struggle women teacher of a for municipal school children