esakal | आता माघार नाही, आरक्षणाची पुन्हा लढाई! 21 सप्टेंबरला सोलापूर शहर-जिल्हा बंदची हाक
sakal

बोलून बातमी शोधा

1Maratha_Kranti_Morcha_39 - Copy.jpg

ठळक बाबी...

  • मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर सोलापुरातील मराठा बांधवांची पार पडली बैठक
  • शहर-जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्व बहूजन संघटनांसमवेत दिली आंदोलनाची हाक
  • 21 सप्टेंबरला शहर-जिल्हा बंद करण्याचा बैठकीत झाला निर्णय
  • जिल्ह्यातील 11 आमदारांच्या घरासमोर आसूड ओढा आंदोलन करण्याचे ठरले
  • 'एक मराठा लाख मराठा'ची दिली सकल मराठा समाज व जिजाऊ बिग्रेडने हाक

आता माघार नाही, आरक्षणाची पुन्हा लढाई! 21 सप्टेंबरला सोलापूर शहर-जिल्हा बंदची हाक

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : आर्थिकदृष्ट्या मागास मराठा बांधवांना दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्‍त होऊ लागला आहे. रविवारी (ता. 13) सोलापुरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यावेळी 21 सप्टेंबरला शहर-जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आसूड ओढला जाईल, असा निर्णय या बैठकीत एकमताने ठरला.

मराठा समाजातील गोरगरिब तरुणांसाठी आरक्षण कायम राहायलाच हवे, या मागणीसाठी मागील चार-पाच दिवसांपासून राज्यभर पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, सोलापुरातील तरुणांनी दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर त्याच दिवशी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. रविवारी (ता. 13) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सकल मराठा समाजातर्फे तिरडी मोर्चा काढून सरकारचा व निर्णयाचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. यावेळी त्यावर सुप्रीम कोर्ट, पंतप्रदान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंतरी अजित पवार, अशोक चव्हाण यांची फोटो लावून तिरडी काढण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, अजिंक्‍य पाटील, ओम घाडगे, अर्जून सोनवणे, राज पवार, राहूल दहीहंडे, कुणाल मोरे, श्रीकांत जाधव, अक्षय पांडे आदी उपस्थित होते.

ठळक बाबी...

  • मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर सोलापुरातील मराठा बांधवांची पार पडली बैठक
  • शहर-जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्व बहूजन संघटनांसमवेत दिली आंदोलनाची हाक
  • 21 सप्टेंबरला शहर-जिल्हा बंद करण्याचा बैठकीत झाला निर्णय
  • जिल्ह्यातील 11 आमदारांच्या घरासमोर आसूड ओढा आंदोलन करण्याचे ठरले
  • 'एक मराठा लाख मराठा'ची दिली सकल मराठा समाज व जिजाऊ बिग्रेडने हाक


आरक्षण कायमस्वरुपी मिळायलाच हवे
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. अनेक गोरगरिबांना आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण, नोकरीत संधी मिळाली. मात्र, पुन्हा आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्‍त करण्याच्या निमित्ताने 21 तारखेला शहर व जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- माऊली पवार, जिल्हा समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा


महिलांची राहील लक्षणीय उपस्थिती
मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम राहावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 21 सप्टेंबरला शहर व जिल्हा बंद करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहर-जिल्ह्यातील सर्वच मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती असेल. जोवर आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय होत नाही, तोवर आंदोलन सुरुच राहील.
- निर्मला शेळवणे, जिल्हाध्यक्षा, जिजाऊ बिग्रेड