अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडांचा गळाला मोहोर ! अस्मानी संकटामुळे शेतकरी बेजार 

अनिल जोशी 
Thursday, 18 February 2021

चारे परिसरात मागील दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामान व बुधवारी (ता. 17) झालेल्या बिगर मोसमी पावसामुळे रब्बी पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. रात्रीच्या जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांना लागलेला मोहोरही गळाला आहे. 

चारे (सोलापूर) : चारे परिसरात मागील दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामान व बुधवारी (ता. 17) झालेल्या बिगर मोसमी पावसामुळे रब्बी पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. रात्रीच्या जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांना लागलेला मोहोरही गळाला आहे. 

चारे परिसरातील वालवड, पाथरी या गावांतील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यापूर्वी रब्बी हंगामातील काढणीयोग्य झालेल्या ज्वारी, हरभरा, गहू, जवस, कांदा या पिकांचे तर द्राक्ष, आंबा, चिंच या फळबागांचे नुकसान झाले आहे. बोरगाव, बाभूळगाव, आगळगाव येथे नव्याने लावण्यात आलेल्या केशर, नीलम, मल्लिका या जातीच्या आंबा बागांचे क्षेत्र वाढले आहे. द्राक्ष बागेपेक्षा कमी रिस्क असल्याने अनेक शेतकरी आंबा पिकाकडे वळले आहेत. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सलग फळे लागताना बिगर मोसमी पावसामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान होत आहे. 

ढगाळ हवामान, नुकत्याच झालेल्या पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लागलेला मोहोर गळाला आहे. तसेच या आंबा बागेत बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. तर काही आंबा बागेत दावनीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. याचा परिणाम म्हणजे फळ गळती होत आहे. तौर, लहान लहान आंबेही गळून जात आहेत. राहिलेली फळे टिकवण्यासाठी बुरशीनाशक, कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. याचा खर्च वाढला आहे. 

गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद होत्या. वाहतूक व्यवस्था ठप्प होती. बाहेरचे व्यापारी आले नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर माल मिळेल त्या भावात विकावा लागला होता. शासनाने पंचानामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

गेल्या वर्षी कोव्हिडमुळे लॉकडाउन होता. त्यामुळे आंबा मिळेल त्या भावात विकला. या वेळी बिगर मोसमी पावसाने आंबा बागा धोक्‍यात आहेत. शासनाने मदत करावी. 
- सुहास ननवरे, 
आंबा उत्पादक, बोरगाव (खुर्द) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non seasonal rains at Chare have caused severe damage to mango trees