मोकाटांना चाप लावणारा "मरवडे' पॅटर्न! ग्रामस्तरीय समितीची कार्यवाही सुरू 

Marwade
Marwade

मरवडे (सोलापूर) : जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वेळीच उपाययोजना केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या भागात रोखू शकतो, हे ध्यानी घेऊन मरवडे (ता. मंगळवेढा) येथे मोकाट फिरणाऱ्यांना दंडाच्या मार्गाने चाप लावण्यात येत आहे. गावातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करत ग्रामस्तरीय समितीकडून कारवाई केली जात आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्याचा "मरवडे पॅटर्न' सध्या चर्चिला जात आहे. 

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावास नागरिकच जबाबदार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडूनही वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाच्या सूचना अमलात आणणे आवश्‍यक असताना "आमच्या परिसरात अजून कोठे कोरोना आहे?' असा सूर काढला जात होता. ग्रामीण भागातील लोकांच्या या भूमिकेमुळेच खेड्यापाड्यातही कोरोना विषाणूच्या साथीचा शिरकाव झालेला पाहावयास मिळत आहे. नुकतेच मंगळवेढा तालुक्‍यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्या गावातही कोरोना हजेरी लावेल, हे लक्षात घेऊन मरवडे येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे. 

मरवडे ग्रामपंचायतीने गावातील सर्व कुटुंबांना सॅनिटायझरचे वाटप करणे, जंतुनाशक औषधांची फवारणी ही कामे केली आहेत. आता ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून मास्क घालूनच फिरणे, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन करणे, अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने ठरवून दिलेल्या वेळेतच उघडणे व बंद करणे, काम असेल तरच घराबाहेर पडणे, दुचाकीधारकांचा प्रवास याविषयी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जात आहे. 

ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष श्री. वाघमोडे, सचिव जयवंत भांडे, सरपंच ताई मासाळ, पोलिस पाटील महेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्य करीत आहे. ग्रामरक्षक दलातील प्रशांत सूर्यवंशी, अविनाश फटे, सोनू शिंदे, प्रशांत केंगार, रविकांत तेली व ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग मोरे, शाहजहान मुलाणी, नवनाथ बनसोडे यांच्या कारवाईमुळे मोकाट फिरणारे चांगलेच धास्तावले आहेत. त्यासोबतच कोरोना साथीविषयी जनजागृती करणे, गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी व आरोग्य तपासणी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे, धूम्रपान करणाऱ्यावर कडक कारवाई, स्वस्त धान्य दुकान, किराणा दुकान व भाजीपाला विक्रेते याठिकाणीची गर्दी टाळण्यासाठी सुयोग्य नियोजन करणे याबाबतीतही समिती काळजीपूर्वक काम करीत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com