
आंबा, चिंच, वड, पिंपळ, उंबर, करंज यासारख्या महावृक्षांचे पर्यावरणासाठी जतन करण्याच्या दृष्टीने प्लॅनेट अर्थ फाउंडेशन या संस्थेच्या वतीने वृक्षमालक व संस्थांमध्ये विशेष करार घेतला जातो. त्यामुळे या वृक्षांचे अस्तित्व राखण्यासाठीचा प्रयोग आता हिरवाईच्या चळवळीत रुजू लागला आहे.
सध्या पर्यावरणामध्ये महावृक्षांची भूमिका अत्यंत दीर्घ काळासाठी नव्हे, तर काही पिढ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे. मात्र प्रत्यक्षात या वृक्षाला पर्यायी झाडांची लागवडदेखील फारशी उपयोगी ठरत नाही. केवळ हे महावृक्षच टिकवण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.
सोलापूर,; परिसरातील महावृक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठी हिरवाईच्या चळवळीतून प्रयत्न करण्यात येत आहे. हे महावृक्ष दीर्घकाळ संरक्षित असावेत, यासाठी विशेष करार पध्दतीचा उपयोग केला जाऊ लागला आहे. आंबा, चिंच, वड, पिंपळ, उंबर, करंज यासारख्या महावृक्षांचे पर्यावरणासाठी जतन करण्याच्या दृष्टीने प्लॅनेट अर्थ फाउंडेशन या संस्थेच्या वतीने वृक्षमालक व संस्थांमध्ये विशेष करार घेतला जातो. त्यामुळे या वृक्षांचे अस्तित्व राखण्यासाठीचा प्रयोग आता हिरवाईच्या चळवळीत रुजू लागला आहे.
सध्या पर्यावरणामध्ये महावृक्षांची भूमिका अत्यंत दीर्घ काळासाठी नव्हे, तर काही पिढ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे. मात्र प्रत्यक्षात या वृक्षाला पर्यायी झाडांची लागवडदेखील फारशी उपयोगी ठरत नाही. केवळ हे महावृक्षच टिकवण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे. या वृक्षांचा लाभ पर्यावरण किंवा जैवसाखळीला 50 वर्षे किंवा त्याच्या पटीमध्ये होतो. अशा प्रकारचे वृक्ष तोडून टाकण्याचे प्रकार सातत्याने होतात. विशेषतः लाकूड कटाई व्यावसायिक, वृक्ष मालकांकडून कापण्याची परवानगी मिळवतो. वृक्ष मालकास त्या वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व माहिती नसल्याने ही झाडे सातत्याने तोडली जात आहेत. तसेच रस्ता रुंदीकरण, शेती वाढवणे, नवीन बांधकाम, विकासकामे आदी अनेक लहान-सहान कारणांमुळे या महावृक्षांची संख्या कमी झाली आहे.
सुरवातीला सांगली जिल्ह्यातील शिराळा भागात प्लॅनेट अर्थ फाउंडेशनमार्फत याबाबतचे सर्वेक्षण केले. तेव्हा विशिष्ट भागात या झाडांची संख्या अत्यंत कमी झाल्याचे दिसून आले. एका अर्थाने त्या भागातील पर्यावरणाला या वृक्षतोडीने गेल्या 25 ते 50 वर्षात फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. त्यावर उपाय म्हणून प्लॅनेट अर्थ फाउंडेशन संस्थेकडून महावृक्षाचे सर्वेक्षण, त्याचे खाजगी मालकांची माहिती संकलित करुन पुढील 25 वर्षांसाठी झाडांचे संवर्धन केले जाते.
सोलापुरातही प्रयत्न
वृक्ष मालकासोबत झाड जतन करण्याचा 25 वर्षाचा करार केला जातो. संस्था याबाबत झाडांचे संगोपन व काही कीड पडल्यास उपाययोजना करते. त्यामुळे दीर्घकाळ हे झाड टिकवून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण वेगळे काम सुरु झाले आहे. सोलापुरातदेखील महावृक्ष जतनाची ही संकल्पना रुजवण्यासाठी निसर्गप्रेमींचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
महावृक्षावर पक्ष्यांचा अधिवास सर्वाधिक
महावृक्षावर पक्ष्यांचा अधिवास सर्वाधिक असतो. या झाडांची इकोसिस्टीम तयार झालेली असते. त्यामुळे जैवसाखळीत त्यांचे योगदान खूप अधिक व दीर्घ काळाचे असते. पण रस्ते काम व शहरीकरणात महावृक्षाची तोड होत आहे. नैसर्गिक जैवसाखळीला उपयोग होत नाही, अशी विदेशी झाडे लावली जातात. त्यामुळे महावृक्षाचे जतन करण्याचा प्रयत्न करारपध्दतीने प्रभावी होईल. सध्या देवळातील धार्मिक महत्त्वाची झाडे जतन करून त्याभोवती मोकळी जागा ठेवून बांधकाम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घर बांधताना वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकास हा प्रकार रुजायला हवा.
-सिद्राम पुराणिक, वृक्ष अभ्यासक, सोलापूर