महापौरांनाच मिळतेय चार दिवसांआड पाणी ! आता शहरवासीयांना होणार दोन दिवसांआड पाणीपुरवठा? 

Water Suply
Water Suply

सोलापूर : शहरासाठी दररोज हिप्परगा तलावातून पाच ते 15 एमएलडी, टाकळीतून 80 एमएलडी आणि उजनीतून 75 एमएलडी पाणी मिळते. या तीन स्रोतांतून सुरळीत पाणीपुरवठा सुरू असतानाही खुद्द महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह त्यांच्या भागातील नागरिकांना चार दिवसांआड पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच नागरिकांना दोन दिवसांआड पाण्याचे आश्‍वासन दिले होते. उन्हाळा असो की पावसाळ्यातही नागरिकांना जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. 

सोलापूर ते उजनीची पाइपलाइन 1998 मध्ये टाकण्यात आली. 2013 च्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन टाकलेल्या पाइपलाइनला गळती लागली आणि दुसरीकडे शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढल्याने पाण्याची गरज काळानुरूप वाढली. त्यामुळे आता स्मार्ट सिटी योजनेतून दुसऱ्या समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले. आता हे काम दीड वर्षात पूर्ण होणार आहे. दरम्यान, हद्दवाढ भागातील पाइपलाइन जुनी आणि कमी इंचाची असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. हद्दवाढ भागात चार दिवसांआड दोन तास पाणीपुरवठा केला जातो, तर शहरात तीन दिवसांआड तीन तास पाणीपुरवठा केला जात आहे. यावर विरोधी पक्षांचे नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांना निवडणुकीपूर्वीच्या वचननाम्याची आठवण करून दिली. त्यानंतर आम्ही एक दिवसाआड नव्हे तर दोन दिवसांआड पाणी पुरवठ्याचे आश्‍वासन दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर हद्दवाढ भागाला तीन दिवसांआड तर शहराला दोन दिवसांआड पाणी देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. 

प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन 
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, शहरातील नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळावे, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. पाण्याचा वेळ कमी करून शहरातील सर्वच भागाला तीन-चार दिवसांऐवजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा व्हावा, असे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल. त्यानंतर ठोस उपाययोजना केल्या जातील. 

हद्दवाढ भागातील नागरिकांचे हाल दूर होतील 
महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, शहराला तीन दिवसांआड तर हद्दवाढ भागाला चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हद्दवाढ भागातील नागरिकांकडे पाणी साठवण्यासाठी मोठी भांडी नसतात, पाण्याचा अपव्ययही वाढतो. या पार्श्‍वभूमीवर सध्याचा वेळ कमी करून दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. 

आकडे बोलतात... 

  • शहराची दररोजची पाण्याची गरज : 280 एमएलडी 
  • तीन स्रोतांतील दररोजचे पाणी : 160 एमएलडी 
  • पाण्याची दररोजची गळती : 38 ते 40 एमएलडी 
  • अंदाजित पाणी चोरी : 10 ते 12 एमएलडी 
  • दरवर्षीचे पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट : 70.29 कोटी 
  • वसूल होणारी पाणीपट्टी : 39 ते 42 कोटी 

टाकळी ते जुळे सोलापूर पाइपलाइनची मागणी 
शहराचा पाणीपुरवठा वर्षानुवर्षे नियमित होऊ शकलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी टाकळी ते जुळे सोलापूर अशी नवीन पाइपलाइन करावी, असा प्रस्ताव मांडला. मात्र, टाकळी हा खात्रीशीर स्रोत नसल्याने सरकारची कोणतीही तशी योजना नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, या नव्या पाइपलाइनसाठी 125 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी कोठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोठेंना मुंबईला येण्यास सांगितल्याने त्या वेळी काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com