मंगळवेढ्यात आता वाहन मालकांनी निवडला ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा पर्याय !
मंगळवेढा (सोलापूर) : ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्यांकडून होणारी फसवणूक व कमी तोडणीमुळे त्रस्त झालेल्या वाहन मालकांनी यातून पर्याय निवडत आता ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा पर्याय निवडला आहे.
चार कारखाने असलेल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून ऊस गाळपासाठी परजिल्ह्यातून टोळ्या गोळा करताना संघर्ष करावा लागत आहे. त्यामध्ये कारखानदारांकडून घेतलेल्या उचलीला प्रत्येक मजुराला दिलेल्या रकमेत एका हंगामामध्ये घेतलेल्या उचलीइतका व्यवसाय होत नसल्यामुळे वाहन मालकाला कारखान्याने दिलेल्या उचल रकमा वाहन मालक व मजुरांकडे अडकून राहिल्या. यामध्ये काही कारखानदारांनी वाहन मालकावर इतर खासगी बॅंका व पतसंस्थांच्या कर्जाचा बोजा टाकल्यामुळे कारखानदारांनी मजुरांच्या मजुरीचा विचार न करता थेट वाहन मालकांचे वाहन ओढून आणणे व न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब केल्यामुळे बहुतांशी वाहन मालक कर्जबाजारी झाले तर काही मालकांनी हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला.
परंतु यंदाच्या गळीत हंगामामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे कार्यक्षेत्रात उपलब्ध झालेल्या उसाची तोड वेळेत करण्यासाठी मजूर उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्याबाहेरील बहुतांश मजुरांच्या मुकादमांकडून मागणीप्रमाणे टोळ्यांचा पुरवठा होत नसल्यामुळे या व्यवहारात मोठी आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत हार्वेस्टर खरेदीला गती आली. हार्वेस्टरसाठी मोठ्या कर्जाची गुंतवणूक बॅंकेला करावी लागणार असल्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांकडून एवढे मोठे कर्ज तालुक्यातील शेतकऱ्याला उपलब्ध होत नसल्यामुळे यासाठी खासगी बॅंका व पतसंस्था पुढे आल्या. त्यांच्या पुढाकारामुळे सध्या 15 ते 20 हॉर्वेस्टर आले. त्यामुळे कमी वेळेत व कमी खर्चात जादा व्यवसाय करणे शक्य होणार आहे. वाहन मालक व कारखानदाराला हे परवडणारे आहे. शिवाय टोळ्यांकडून होणारा फसवणुकीचा धोका टळणार आहे. त्यामुळे या व्यवसायात चांगले उत्पन्न देखील तोडणी हंगामात मिळणार आहे.
याबाबत निंबोणीचे विलास ढगे म्हणाले, आतापर्यंत टोळ्यांच्या माध्यमातून ऊस तोडणीचा व्यवसाय केला; परंतु अपेक्षित फायदा होत नव्हता. टोळीकडून काही वेळेला फसवणुकीचे प्रकार देखील घडले आहेत. परंतु ट्रॅक्टरच्या माध्यमातून दुसरा व्यवसाय करणे शक्य नसल्यामुळे हा व्यवसाय पुढे चालवण्यासाठी हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणीचा पर्याय निवडला. त्यासाठी धनश्री मल्टिस्टेट बॅंकेने आधार दिला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.