ग्रामीण भागात वाढतेय व्यायाम करणाऱ्यांची संख्या ! तरुणांची सुरू पोलिस महाभरतीची तयारी 

अक्षय गुंड 
Saturday, 21 November 2020

सध्या सर्वत्र कमी - अधिक प्रमाणात थंडीचा कडाका जाणवत आहे. परिणामी ग्रामीण भागात व्यायाम करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच राज्य सरकारने पोलिस महाभरती जाहीर केल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पहाटेच्या वेळी युवकांची व्यायाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या सर्वत्र कमी - अधिक प्रमाणात थंडीचा कडाका जाणवत आहे. परिणामी ग्रामीण भागात व्यायाम करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच राज्य सरकारने पोलिस महाभरती जाहीर केल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पहाटेच्या वेळी युवकांची व्यायाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. 

थंडीच्या दिवसात व्यायाम करणे म्हणजे शरीरासाठी लाभदायक असते, असे म्हटले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर वयोवृद्ध व्यक्तींसह युवकांची फौज व्यायाम करण्यासाठी सज्ज असलेली दिसत आहे. त्यातच राज्य सरकारने पोलिस महाभरती जाहीर केले असल्याने, युवकांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे. "हीच ती वेळ !' म्हणत, युवक देखील पहाटेच्या गुलाबी थंडीत मोठ्या संख्येने व्यायाम करताना दिसत आहेत. 

कोरोनासारख्या महामारी रोगाशी सामना करण्यासाठी व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम हा चांगला उपाय असू शकतो. त्यामुळे दिवसेंदिवस व्यायाम करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. 

शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही वॉकिंग, जॉगिंगचे महत्त्व पटत असल्यामुळे भल्या पहाटे उठून महिला, लहान मुले यांच्यासह तरुणीही वॉकिंगला निघालेल्या दिसून येत आहेत. उपळाई बुद्रूक येथील तालमीतील आखाड्यात कुस्तिगीरांचा राबता वाढला असून, लाल मातीत कुस्तीचे धडे घेताना लहान मुलांसह तरुणही मश्‍गूल झाले आहेत. 

थंडीच्या दिवसात व्यायाम करण्याची मौज काही वेगळीच असते. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील व्यायाम करणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. नागरिकांना व्यायामाचे महत्त्व चांगले समजू लागले आहे. 
- सुयश नकाते 
युवक, उपळाई बुद्रूक 

कोरोना या रोगामुळे बरेच जण घरी असतात. त्यामुळे अपचन व वजन वाढण्याची समस्या उद्भवत आहे. अशा सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे व्यायाम आहे. 
- सुरेश माळी 
शिक्षक, उपळाई बुद्रूक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of exercisers is increasing in rural areas due to cold