"सहा महिन्यांपासून भाकरी अन्‌ डाळीने मला मृत्यूपासून परावृत्त करत दाखवली नव्या दिवसाची आशा' 

Nusruddin
Nusruddin

सोलापूर : रेल्वे स्टेशनवर झोपताना अनेक वेळा रेल्वेच्या रुळाखाली झोपून जीव द्यावा, असा विचार मनात येत असे. पण मिळालेल्या भाकरी अन्‌ डाळीने त्या दिवसापुरते मला मृत्यूपासून बाजूला ढकलत नव्या दिवसाची आशा दाखवली. अखेर तुमच्या मेहेरबानीने घर मिळाले... हे शब्द होते घराकडे परतीच्या वाटेवर निघालेल्या नसरुद्दीन मोमीन यांचे. मूळच्या इचलकरंजीचे नुसरुद्दीन मोमीन यांची कोरोना संकटात घडलेली ही कहाणी सोलापूर शहरात घडली. 

याबाबत घडलेला घटनाक्रम असा की, मिरज भागात काम करत असताना मोमेन चाचाला बाळू नावाच्या व्यक्तीने सोलापुरात काम देतो म्हणून सोबत आणले. तो दिवस होता 21 मार्चचा. सोलापुरात ते पोचताच कोरोना लॉकडाउनमुळे वाहने बंद झाली. सोबत आणणारी व्यक्ती धावपळीत तुळजापूरला निघून गेली. गावाकडे परत जाण्याइतके सहाशे ते सातशे रुपये होते पण वाहने बंद झाली. रेल्वे स्टेशनवर कपड्याची थैली व एक मोबाईल घेऊन थांबण्याची वेळ आली. पण स्टेशनवर रात्रीच्या वेळी कुणीही उठवावे व हाकलून द्यावे अशी स्थिती होती. जवळ असलेले पैसे जेवणखानात खर्च होऊ लागले. काही दिवसात पैसे संपले व कोरोनाचे संकट वाढतच गेले. कुणी कुणाला विचारत नव्हते. अनेक प्रवाशांप्रमाणे स्टेशनच्या आसऱ्याने राहण्याची वेळ आली. स्टेशनवर काही लोक गरजूंना जेवण देत होते, त्याच्यावर काही दिवस काढले. 

रात्रीच्या वेळी कपडे व मोबाईलची पिशवी झोपेत कुणीतरी हिसकावून घेतले. उरलासुरला मोबाईलचा संपर्क तुटला. सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त आणि वाहने बंद झाली. कुणी म्हणणे ऐकून घेण्यास तयार होत नव्हते. इचलकरंजीचे घर गाठता येणे अशक्‍य दिसू लागले. स्थानकाबाहेर पडून बॉम्बे बेकरीच्या परिसरातील अर्पाटमेंटमध्ये पार्किंगच्या जागेत निवारा मिळाला. आजूबाजूच्या घरात दालरोटी मागत प्रत्येक दिवस जाऊ लागला. अनेक महिने झाले तरी आता घर कायम सुटल्याचे लक्षात येऊ लागले. दुसरीकडे, कोरोना संकटाचा कहर सर्वत्र वाढतच चालला होता. 

20 ऑगस्ट रोजी अभिजित भडंगे हे रहिवासी बॉम्बे बेकरीजवळ गेले होते. तेव्हा अस्ताव्यस्त कपड्यात नुसरुद्दीन यांनी श्री. भडंगे यांना "माझ्या गावात कुटुंबीयाजवळ मला मरण मिळेल का?' असे विचारले. तेव्हा त्यांनी उत्सुकतेपोटी चौकशी करत घरचा पत्ता मागितला. तेव्हा अभिजित भडंगे यांनी इचलकरंजीचे पोलिस अधिकारी राजेंद्र उशिरे यांना फोन करून घरच्यांचा शोध घेण्यासाठी व्हॉट्‌सऍपवर त्यांचा फोटो पाठवला. काही दिवसांतच नुसरुद्दीन मोमीन यांच्या घरच्यांचा शोध लागला. श्री. भंडगे यांना सोलापूरचे याकूब शेख व इमाम म्हणून ओळखले जाणारे मौलाना शेख हे मदतीसाठी पुढे आले. त्यानुसार नुसरुद्दीन मोमीन यांचे पुतणे फैजुल्ला मोमीन हे सोलापुरात नुसरुद्दीन मोमीन यांना घरी नेण्यासाठी दाखल जाले. तब्बल सात महिन्यांनंतर घरच्यांना पाहून नुसरुद्दीन मोमीन यांचे डोळे अश्रूंनी भरले. "सब मेहरबानी हो गयी साब' असे म्हणत त्यांनी सोलापूरचा निरोप घेतला. 

या वेळी बाळी वेस येथील रहिवासी अक्षरमित्र अभिजित भडंगे म्हणाले, माझे मरण आले तर माझ्या गावात यावे, असे नुसरुद्दीन मोमीन यांनी सांगितल्याने अस्वस्थ होऊन महिनाभरात इचलकरंजीत शोधाशोध केली. तेव्हा अखेर नुसरुद्दीन मोमीन यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करता आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com