उजनी पाईपलाइनसाठी टेंभूर्णी येथे अडथळा ! वाचा सविस्तर

1ujani_20visarga_5 - Copy.jpg
1ujani_20visarga_5 - Copy.jpg

सोलापूर : उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून उजनी ते सोरेगावपर्यंतची वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम मुदतीत पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या. दरम्यान, पाईपलाइनसाठी 138 हेक्‍टरचे संपादन होणार असून शेतकऱ्यांना त्या जागेवर पुन्हा पिके घेता येतील. त्यामुळे कोणीही अडवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, तीन तालुक्‍यांतील 35 पैकी 34 गावांचा सर्व्हे पूर्ण झाला असून टेंभूर्णी येथे थोडासा पेच निर्माण झाला असून तो आमदार बबनराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन दोन दिवसांत सोडविला जाणार आहे.

शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून 110 किलोमीटर लांबीची नवी पाईपलाइन टाकली जात आहे. पाईपलाइन संपूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. पाईपलाइनचे काम मुदतीत पूर्ण व्हावे, जेणेकरुन सोलापुकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे पालकमंत्री भरणे म्हणाले. पाईपलाइन जमिनीखालून असल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही. त्यांना त्या जमिनीवर सर्व पिके घेता येणार आहेत. दरम्यान, महापालिकेने फेब्रुवारी 2020 रोजी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार शासनाकडून वापर हक्काच्या संपादनाचा इरादा राजपत्राद्वारे प्रसिद्ध होणे बाकी आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील 21 दिवसांत बाधित खातेदारांच्या लेखी हरकती घेतल्या जातील. त्यानंतर 30 दिवसांत प्राप्त हरकतींवर सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, ढेंगळे- पाटील यांनी पाईपलाइनबद्दलच्या अडचणी सांगत स्मार्ट सिटीच्या कामांची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर ते उजनी पाईपलाइन जाणार माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातून 
  • तीन तालुक्‍यांतील 35 गावांमधील 138 हेक्‍टरच्या वापर हक्कासाठी भूसंपादनाचे काम सुरू 
  • 35 पैकी 34 गावातील मोजणीचे काम झाले; बाधित जमिनीवरील वृक्ष, शेती, घरांचे होणार पंचनामे 
  • पंचनामे व मूल्यांकन करण्याचे काम सुरू करुन संबंधितांना काही दिवसांत मिळेल नुकसान भरपाई 
  • 35 गावांमधील पाईपलाइनसाठी संपादन होणाऱ्या जमिनीचा यापूर्वी झाला आहे मूळ सर्व्हे 
  • टेंभुर्णी गावाचा तिढा; खर्च अन्‌ नुकसान टाळण्यासाठी जुन्या महामार्गाजवळून जाणार पाईपलाइन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com