Breaking ! जमावबंदी आदेशाचा भंग ! महालिंगराया यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह 74 जणांवर गुन्हा

हुकूम मुलाणी 
Monday, 16 November 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमावबंदीचा आदेश दिला. भाविकांची मागणी लक्षात घेता शासनाने नियमांचे पालन करून देवदर्शन घेण्यास परवानगी दिली असतानाच पाडव्याच्या पूर्वसंध्येला तालुक्‍यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेतील भेटीदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी, पालख्यांसोबतचे भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह 74 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमावबंदीचा आदेश दिला. भाविकांची मागणी लक्षात घेता शासनाने नियमांचे पालन करून देवदर्शन घेण्यास परवानगी दिली असतानाच पाडव्याच्या पूर्वसंध्येला तालुक्‍यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेतील भेटीदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी, पालख्यांसोबतचे भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह 74 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणाची फिर्याद गुप्तवार्ता विभागाचे राजकुमार ढोबळे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने जमावबंदीचा आदेश दिल्यामुळे तालुक्‍यामध्ये गैबीपीर उरूस, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, लक्ष्मी दहिवडी येथील यात्रा, हुन्नूर येथील भेट सोहळा असे तालुक्‍यात होणारे मोठे कार्यक्रम रद्द झालेले असताना, दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला (रविवारी) तालुक्‍यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान या परिसरात शीलवंती (उमरगा), बिरोबा (शिरढोण), विठोबा (सोन्याळ, जत), जकराया (येणकी), बिराप्पा (जिरअंकलगी), बिरोबा (हुन्नूर), मड्डी जकराया, महालिंगराया (हुलजंती) या गावातील ग्रामदैवताच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा गावाजवळील ओढ्यात दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत आयोजित केला जातो. याही वर्षी या सोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही, तोंडाला मास्क लावला नाही व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दलचा ठपका देवस्थान कमिटीवर ठेवून या भेटीसाठी आलेल्या पालखीसोबतच्या भाविकांसह एकूण 74 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आणखी काहींची वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा भेट सोहळा रद्द करण्यात आला असून, नागरिकांनी यात्रेत गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी स्पीकरवरून गावकऱ्यांना केले होते. तरी देखील यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर गावांच्या पालख्या प्रमुखांमध्ये योग्य समन्वय साधला नाही. तरीदेखील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. पालख्यांच्या प्रमुखानी पोलिसांच्या सूचनेला व आदेशाला बगल देत विनापरवाना भेटीचा सोहळा नियमांचे पालन न करता आयोजित करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे आलेल्या भाविकांवर कारवाईचा बडगा उगारत भाविकांची मोठ्या प्रमाणात पळापळ सुरू झाली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officials of Mahalingaraya Yatra Committee have filed a case for violating the curfew order