esakal | अनेकांची सुरक्षित कुटुंबे हादरलेली असताना, हे दीडशे बेघर वृद्ध सुरक्षित कसे? 
sakal

बोलून बातमी शोधा

Beghar

"थॅंक्‍स, तुम्ही आम्हा वृद्धांना या महामारीच्या संकटातून वाचवले. बाहेरील भागात सुरू असलेल्या आजाराच्या संकटाची कल्पना करवत नाही. केवळ आपण घेतलेल्या काळजीमुळे हे शक्‍य झाले...' हे शब्द होते बेघर निवारा केंद्र येथील एका 95 वर्षीय वृद्धाचे. 

अनेकांची सुरक्षित कुटुंबे हादरलेली असताना, हे दीडशे बेघर वृद्ध सुरक्षित कसे? 

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर (सोलापूर) : "थॅंक्‍स, तुम्ही आम्हा वृद्धांना या महामारीच्या संकटातून वाचवले. बाहेरील भागात सुरू असलेल्या आजाराच्या संकटाची कल्पना करवत नाही. केवळ आपण घेतलेल्या काळजीमुळे हे शक्‍य झाले...' हे शब्द होते बेघर निवारा केंद्र येथील एका 95 वर्षीय वृद्धाचे. 

कायमचे हरवलेले कुटुंब, प्रतिकारक्षमता नसलेले वृद्धत्व व उपासमारीच्या प्रसंगांनंतरही त्यांनी कोरोनाला चक्क चकवा दिला आहे. मागील काही महिन्यांत दीडशे बेघरांची ही कोरोना मुक्तीची कहाणी आश्‍चर्यचकित करणारी आहे. 

कुमठा नाका भागात महानगरपालिकेने बांधलेल्या दुमजली बेघर निवारा केंद्रात दाक्षिणात्य पद्धतीने वेशभूषा केलेले एक वृद्ध सहज इंग्रजीत संवाद साधत होते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी डोळ्याला काळा चष्मा लावलेला होता. चेन्नई शहरातील एका सुखवस्तू कुटुंबातून आलेले लक्ष्मैय्या हे अध्यापनाच्या क्षेत्रातील नाव. दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा असलेले ते वृद्ध सर्वांशी इंग्रजीत बोलत होते. घरातील वादाला कंटाळलेले तरीही शिक्षकी पेशाचे ते वृद्ध या निवाऱ्यात सर्वांना धीर देतात व सोबत राहणाऱ्या लोकांची सुख-दुःखे जाणून त्यांच्या अडचणी समजून घेतात. 

थोडे पलीकडे गेले की हातात काठी घेतलेले मधुकर पवार किल्लारीच्या आठवणी सांगतात, की "भूकंपामध्ये सर्व कुटुंब संपले अन्‌ मीही घराबाहेर पडलो. जमेल तशी हॉटेलमध्ये काम करून काही रक्कम गोळा करून आतापर्यंत गुजराण केली. पण कोरोनाचे संकट आले अन्‌ कामधंदा बुडाला. तेव्हा येथे येऊन राहिलो. आता किल्लारी गावाकडे वळून पाहण्याची इच्छा राहिली नाही.' 

त्यांच्या बाजूला बसलेले सेवानिवृत्त कर्मचारी पत्नीच्या निधनानंतर बसलेल्या धक्‍क्‍यातून स्वतःला सावरत आहेत. एक वृद्ध मागील काही महिन्यांपासून दर्ग्याच्या आवारात राहात होते. तेथे त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी येत असत. पण कोरोनाच्या काळात ते या केंद्रात आले अन्‌ कोरोनापासून वाचले. 

मधुर आवाजात बोलणाऱ्या वंदना या पूर्णपणे दृष्टिबाधित; पण त्यांचे राहणे व जगणे अगदी आत्मविश्‍वासाचे आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेले दिल्लीचे भारत हे दिल्ली प्रवासाचे भाड्याची रक्‍कम मदत म्हणून मिळाली तर कुटुंबात परत जाण्याच्या तयारीत आहेत. 

नीलिमा या एकाकी असल्या तरी त्या मनाने सावरल्या आहेत. हे एकटेपण त्यांनी स्वीकारले आहे. एका बेघराचा पत्ता तांडूर (कर्नाटक) येथील एसबीआय बॅंकेजवळचा आहे; पण त्यांना तेथे कसे पोचायचे, हा प्रश्‍न आहे. 

या बेघर निवारा केंद्रात लॉकडाउनच्या काळात एकूण 145 जणांनी आश्रय घेतला होता. त्यापैकी सर्वच जण कोरोना संसर्गाच्या काळात रस्त्यावर फिरत होते. प्रतिकार क्षमता संपलेले वृद्धत्व असताना देखील ते कोरोनापासून मुक्त राहिले. अनेकांची सुरक्षित कुटुंबे हादरलेली असताना, ज्यांनी घरच हरवले आहे, त्यांना मात्र कोरोना संसर्ग का झाला नाही? याचा विचार करून बेघर गृहाचे कर्मचारी आजही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल