चोरीला गेलेले अडीच लाखांचे दागिने मिळाले वर्षानंतर परत ! 

बाबासाहेब शिंदे 
Tuesday, 12 January 2021

चिखर्डे येथे 3 मे 2019 रोजीच्या रात्री चोरट्यांनी चौधरी यांच्या घराचा कडी- कोयंडा, कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत पांगरी पोलिसांत तक्रार दाखल होताच तपासाची सूत्रे हलवून गुन्ह्यातील तीन जणांस अटक करण्यात आली होती.

पांगरी (सोलापूर) : चोरी झाल्यानंतर चोरट्याकडून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम परत मिळणे मुश्‍किलीचे असते. मात्र एक वर्षापूर्वी दोन लाख 47 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी प्रयत्न करून चिखर्डे येथील नानासाहेब लिंबराज चौधरी यांचे चोरीला गेलेल्या सोन्याच्या पाटल्या व अंगठ्या असा अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुपूर्द केला. 

चिखर्डे येथे 3 मे 2019 रोजीच्या रात्री चोरट्यांनी चौधरी यांच्या घराचा कडी- कोयंडा, कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत पांगरी पोलिसांत तक्रार दाखल होताच तपासाची सूत्रे हलवून गुन्ह्यातील तीन जणांस अटक करून नानासाहेब चौधरी यांच्या घरातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 40 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या व 15 ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या असा एकूण 2 लाख 47 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यातील फिर्यादी यांनी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज करून देखील काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना तो मिळू शकला नव्हता. त्यामुळे तो मुद्देमाल मागील एक वर्षापासून पोलिस ठाण्यात जप्त होता. 

त्यानंतर प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी नानासाहेब चौधरी यांना संपर्क करून कोर्टात पुन्हा नव्याने अर्ज दाखल केल्यानंतर बार्शी न्यायालयाशी व सरकारी अभियोक्ता यांच्याशी चर्चा करून अर्जदार यांना मुद्देमाल ताब्यात देण्याबाबतचा आदेश देण्यासाठी विनंती केली. त्याप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने पोलिस रेझिंग डेचे औचित्य साधून नानासाहेब चौधरी यांना 40 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या व 15 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 2 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल देण्यात आला. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट, पोलिस हवालदार श्री. परबत, विनोद बांगर, सुरेश बिरकिले, सुनील बोदमवाड, उमेश कोळी, गणेश घुले, श्री. धोत्रे यांनी पार पाडली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half lakh stolen jewelery was recovered a year later