मोहोळमध्ये होत आहे 'सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड'सह दीड हजार वृक्षांचे रोपण 

चंद्रकांत देवकते 
Monday, 21 September 2020

या वृक्षारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे वरील रोपांनाच पाच फुटांपर्यंत अद्ययावत पाणी साठवण निचरा करणारे सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड बसविण्यात आले आहेत. या ट्री-गार्डलाच पाच फूट पीव्हीसी पाइप जोडला असून त्या पाइपमध्येच ड्रीपची नळी बसविण्यात आली आहे. एकदा पाणी टाकल्यानंतर साधारणतः पंधरा दिवस या झाडांना पाणी द्यावे लागत नाही. वृक्षांना पाण्याचा आवश्‍यक पुरवठा होऊन अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन वृक्षवाढीस मदत होते. 

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ नगरपरिषद हद्दीतील नागरी वनीकरण अंतर्गत 14 व्या वित्त आयोगातून अनुक्रमे प्रभाग क्रमांक पाच व सहा, सात, आठ व 12 मध्ये माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे, बांधकाम सभापती दत्ता खवळे, गटनेते प्रमोद डोके, नगरसेवक संतोष खंदारे, मनीषा फडतरे यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या दीड हजार वृक्षांची लागवड करण्याच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. 

नगर परिषदेच्या माध्यमातून "सुंदर मोहोळ, स्वच्छ मोहोळ' या मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे, बांधकाम सभापती दत्ता खवळे, गटनेते प्रमोद डोके, नगरसेवक संतोष खंदारे, मनीषा फडतरे यांनी आपापल्या प्रभागातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्याच्या कामाची सुरवात केली आहे. याबाबत माहिती देताना गटनेते प्रमोद डोके यांनी सांगितले, की वृक्षारोपणासाठी खास नागपूरहून सहा ते आठ फूट उंचीची अनुक्रमे शिसम, महानिंब, पिंपळ, अर्जुन, मिलीडुबिया, कदंब, करंजे, महागनी, जांभळ व सप्तपर्णी आदी विविध प्रकारची 1500 रोपे आली आहेत. या वृक्षांची लागवडही नागपूरच्याच प्रशिक्षित मजुरांकडून करण्यात येत आहे. 

या वृक्षारोपणाचे वैशिष्ट्य म्हणजे वरील रोपांनाच पाच फुटांपर्यंत अद्ययावत पाणी साठवण निचरा करणारे सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड बसविण्यात आले आहेत. या ट्री-गार्डलाच पाच फूट पीव्हीसी पाइप जोडला असून त्या पाइपमध्येच ड्रीपची नळी बसविण्यात आली आहे. एकदा पाणी टाकल्यानंतर साधारणतः पंधरा दिवस या झाडांना पाणी द्यावे लागत नाही. वृक्षांना पाण्याचा आवश्‍यक पुरवठा होऊन अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन वृक्षवाढीस मदत होते. या झाडांना आधार म्हणून दोन वेळूचा आधार खड्ड्यातूनच देण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण व योजनापूर्वक वृक्षारोपणामुळे पालखी भक्ती मार्ग, स्टेशन रोड, अण्णा भाऊ साठे नगर, आठवडा बाजार आदी ठिकाणचा परिसर सुशोभित दिसत आहे. या वेळी पंकज अस्वरे, उमेश कांबळे, सचिन घाडगे, अनिकेत अष्टुळ, अरुण गायकवाड, महादेव गायकवाड, आनंद जाधव, सचिन रणदिवे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half thousand trees are being planted in Mohol with self-watering tree-guards