esakal | अवघ्या 50 चौरस फुटात एक लाखाचे उत्पन्न : हायड्रोपोनिक्स तंत्राने संजय गादा यांची कामगिरी

बोलून बातमी शोधा

sanjay gada.jpg

येथील कर्णिक नगरातील संजय गादा हे राहतात. कर्नाटकात त्यांची शेती असल्याने त्यांना शेतीची आवड होती. लॉकडाउनच्या काळात काही तरी नविन प्रयोग करावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. मध्यप्रदेशात त्यांनी हायड्रोपोनिक्‍स तंत्राचे शिक्षण घेतले. हायड्रोपोनिक्‍स म्हणजे माती विरहीत शेती होय. केवळ पाण्यामध्ये रोपे ठेवून वाढवण्याची ही पध्दत होय. यामध्ये केवळ कोकोपिटचा उपयोग केला जातो. 

अवघ्या 50 चौरस फुटात एक लाखाचे उत्पन्न : हायड्रोपोनिक्स तंत्राने संजय गादा यांची कामगिरी
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर :  हायड्रोपोनिक्‍सच्या तंत्राच्या माध्यमातून सेंद्रिय पध्दतीने घेतलेल्या भाजीपाला घेत एक मोठे उत्पादन येथील संजय गादा यांनी मिळवले आहे. अवघ्या पन्नास चौ. फुटात त्यांनी दोन गुंठ शेतीएवढे उत्पन्न अत्यल्प खर्चात मिळवले आहे. आता सोलापूर जिल्ह्यात या तंत्राचा प्रचार व प्रसार ते करीत आहेत. 
येथील कर्णिक नगरातील संजय गादा हे राहतात. कर्नाटकात त्यांची शेती असल्याने त्यांना शेतीची आवड होती. लॉकडाउनच्या काळात काही तरी नविन प्रयोग करावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. मध्यप्रदेशात त्यांनी हायड्रोपोनिक्‍स तंत्राचे शिक्षण घेतले. हायड्रोपोनिक्‍स म्हणजे माती विरहीत शेती होय. केवळ पाण्यामध्ये रोपे ठेवून वाढवण्याची ही पध्दत होय. यामध्ये केवळ कोकोपिटचा उपयोग केला जातो. 
त्यांनी सुरुवातीला पालकाचे उत्पादन घेण्याचे ठरवले. केवळ 50 चौ. फुटात त्यांनी पाईपला छिद्रे पाडून त्यात जाळीच्या ग्लासात रोपे लावली. विशेष म्हणजे या तंत्रात पीक जोमदार येते. हे सर्व उत्पादन सेंद्रिय असते. त्यांना दर महिन्याला आठ ते नऊ हजार रुपयांचे पालक भाजीचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे एकदा लावलेला पालक नऊ महिने झाला तरी कायम उत्पादन देतो. सेंद्रिय पालकाची जूडी तब्बल वीस रुपयाला विकली गेली. त्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. म्हणजे हे उत्पन्न दोन गुंठे शेतीच्या उत्पन्ना एवढे होते. या तंत्रात पाण्याचा टीडीएस हा 100-300 एवढा तर पीएच 5.5 ते 6.5 कायम ठेवणे आवश्‍यक असते. 
या पध्दतीने त्यांनी वांगी, ऊस, मेथी, मिरची आदी भाजीपाला लावला आहे. त्यांनी कर्नाटकातून खास पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या वांग्याची रोपे लावली. केवळ चारशे लिटरच्या टॅंकमध्ये मोटर लावून पिकांना पाणी दिले जाते. सोलापूर परिसरात त्यांचा हा प्रयोग पहिला असल्याने त्यांना आता प्रकल्प उभारणी, प्रशिक्षण आदीच्या माध्यमातून या तंत्राचा प्रसार करण्याचे कामही मिळू लागले आहे. तसेच ते घरगुती पध्दतीचे प्रकल्प उभारणीचे काम करून देत आहेत. गार्डन लव्हर्स ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. सातत्याने या तंत्राचा प्रसार वाढतो आहे. सेंद्रिय शेतीची उत्पादने म्हणून या तंत्राने घेतल्या जाणाऱ्या पिकांना भाव देखील चांगला मिळतो.