मुंबईहून सांगोला तालुक्‍यात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

दत्तात्रय खंडागळे 
गुरुवार, 28 मे 2020

बाहेरून येणाऱ्यांनी विलगीकरण कक्षात रहावे 
सध्या मुंबई, पुणे अशा परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींचेच जास्त प्रमाणात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. बाहेरुन गावात व शहरात आलेल्या प्रत्येकांनी इतरांच्या संपर्कात न येता विलगीकरणातच राहिले पाहिजेत. कोरोनाबाबत नागरिकांनी भिती न बाळगता सोशल डिस्टन्ससह इतर नियमाचे काटेकोर पालन केले पाहिजे. 
- उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील निजामपूर येथे मुंबईहून आलेल्या एक जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपर्कातील एक जणाला संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. त्याच्या घरातील अन्य तीन प्रत्यक्ष संपर्क न आलेल्या व्यक्तीचे खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये विलगीकरण करून ठेवलेले आहे. तसेच किडेबिसरी येथील कोरोनाबाधित असलेला व सध्या मिरजेत उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. 
निजामपूर येथील एकजण रविवार (ता. 24) रोजी सकाळी सहा वाजता मुंबई (सांताक्रुज) येथून आलेला होता. सकाळी सदर व्यक्तीस निजामपूर येथील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी आणलेले होते. त्यावेळी त्याला ताप, खोकला असा त्रास होत असल्यामुळे त्यास त्याच दिवशी ग्रामीण रूग्णालय येथे तपासणी करून सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी (ता. सांगोला) येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले होते. त्याचे नमुने कोरोना विषयक चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सदरचा व्यक्ती मुंबईहून आल्यापासून लगेच त्याचे विलगीकरण करण्यात आलेले असल्याने त्याच्या निकटतम संपर्कात फक्त एक व्यक्ती आढळून आली आहे. सदर व्यक्तीस निजामपूर येथील शाळेत अलहिदा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. या व्यक्तीला मेडशिंगी येथील कोविंड केअर सेंटरमध्ये ठेवून संबंधित संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या घरातील अन्य तीन प्रत्यक्ष संपर्क न आलेल्या व्यक्तीचे खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये विलगीकरण करून ठेवलेले आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर व सुरक्षित असून संबंधित व्यक्तींच्या प्रकृतीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. 
तसेच मुंबईमार्गे किडेबिसरी येथे येणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यास मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटलला ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यक्ष संपर्कातील दोन व अन्य एक व्यक्ती याना कोविंड केअर सेंटर, मेडशिंगी येथे ठेवण्यात आलेली होते. तसेच त्यांची कोरोनाबाबतची चाचणी घेण्यात आलेली होती. सदर चाचणीमध्ये संबंधित बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person Corona positive from Mumbai come to Sangola taluka